खाऊगल्ली – थोडा सा मुलायम हो जाये!

>> संजीव साबडे

गणेशोत्सवात गोडधोड प्रकार अधिक खाल्ले जातात. त्यानंतर मात्र काहीतरी तिखट व खमंग खाण्यासाठी जीभ आसुसलेली असते. अशावेळी रुचकर, तिखट सीग कबाब, टुंडे कबाब, काकोरी कबाब यांची लाजवाब खवय्येगिरी करायलाच हवी!

आषाढी एकादशी होऊन गेली आणि गणेशोत्सवही संपला. गेल्याच आठवड्यात अनंत चतुर्दशीला गणरायाचं विसर्जन झालं. अनेकांचे उपासतापास आणि फक्त शाकाहारी खाणे त्या दिवशीच संपले. त्यांच्या दृष्टीने मांसाहारावरील बंदी गणरायाच्या विसर्जनानंतर लगेच उठली. अनेकांनी आता घरी व बाहेर मांसाहार स्रूच केला आहे. घरी मासे, मटन, चिकन आणायला सुरुवात झाली. काहींचा मात्र पूर्ण चातुर्मास असतो. म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी असे चार महिने उपासतापास, व्रतवैकल्ये व फक्त शाकाहार. कार्तिकी एकादशी संपल्यावर दुसऱया दिवसापासून ते मांसाहार करतात, पण अनंत चतुर्दशीपर्यंतच शाकाहार व उपास करणाऱयांची संख्या अधिक. सर्वांना चार-चार महिने उपास व शाकाहार जमत व झेपत नाही. गणेशोत्सवात गोडधोड प्रकार अधिक खाल्ले जातात. घरी गणपती नसले तरी इतरत्र दर्शनाला खिरापत गोडच असते. घरी गणपती असतील तर गोडधोड असतंच. इतकं गोड खाण्याचाही कंटाळा येतो. गणेशोत्सवाच्या काळात जेवणही सात्त्विक असतं.

त्यामुळे काहीतरी तिखट व खमंग खाण्यासाठी जीभ आसुसलेली असते, पण 10/12 मऊ, मुलायम खाल्लं असल्यानं लगेच दाताला त्रास देणारं आणि तुकडा मोडणारं शक्यतो नको असतं. असा एक उत्तम प्रकार म्हणजे टुंडे कबाब. अतिशय मुलायम आणि तोंडात सहज विरघळणारा. तिखट, पण आगीचा जाळ नाही, मटन वा चिकनचा प्रकार, पण सहज खाता येईल असा आणि त्यासोबत कांदा, लिंबू आणि पुदिना-कोथिंबिरीची चटणी. काही जण टुंडे कबाबबरोबर पाव, रुमाली रोटी वा तंदुरी रोटीही घेतात, पण ते असतं पोटभरीसाठी. सारी चव एकवटलेली असते ती त्या लखनऊच्या प्रसिद्ध टुंडे कबाबमध्येच. हा प्रकार मूळ अवध प्रांतातला. लखनऊ हे पूर्वी अवध प्रांताचाच भाग होतं. तर तिथला एक नवाब खाण्याचा खूप शौकीन होता, पण वय झाल्याने व दात पडल्याने त्याला मांसाहारी पदार्थ खाता यायचे नाहीत. तेव्हा लष्करातील एका हात तुटलेल्या सैनिकाने मटनाचे अतिशय मऊ, मुलायम कबाब बनवले. ते नवाबाला खूपच आवडले आणि ते ओळखू जाऊ लागले टुंडे के (हात तुटलेल्याचे) कबाब. ते तोंडात पटकन विरघळत असल्याने गिलौटी कबाब म्हणूनही लोकप्रिय झाले. हे टुंडे वा गिलौटी कबाब पॅटिसप्रमाणे असतात. गिलौटी म्हणजे विरघळणारे. अतिशय मुलायम व मसाल्यांचा मारा नसलेले हे यांचं वैशिष्ट्य .

टुंडे, काकोरी कबाब, शामी कबाब आणि नर्गिसी कबाब हे मूळचे लखनऊचे म्हणजे अवध प्रांतातील. काकोरी कबाब तर टुंडेपेक्षा अधिक नरम, छान आणि महाग. शामी कबाबही दिसतात टुंडे वा काकोरीसारखेच, पण त्यात थोडं बेसन असतं. नर्गिसी कबाब हे दिसायला कोफ्तासारखे. उकडलेल्या अंड्याला मटनाच्या खिम्याचं आवरण असतं यात. अनेकदा नर्गिसी कबाब ग्रेव्हीमध्येही घालतात. मुंबईत हे सर्व कबाब मिळतात, पण आपल्यापैकी बहुसंख्य लोक रेस्टॉरंटमध्ये चिकन टिक्का, सीग कबाब, अंगारा कबाब, आचारी कबाब, लसुणी कबाब, काळी मिरी कबाब मागवतो, पण मुंबईतील सर्व नव्हे, पण बऱयाच रेस्टॉरंटमध्ये टुंडे वा गिलौटी, काकोरी, शामी व नर्गिसी कबाब मिळतात, पण त्यांची फारशी माहिती नसल्यानं आपण ते खाण्याचं टाळतो.

मुंबईत लखनऊ टुंडे कबाब नावाची रेस्टॉरंट्स जोगेश्वरी (पश्चिम), अंधेरी (चार बंगला आणि चकाला), प्रभादेवी (पांडुरंग बुधकर मार्ग), क्लेअर रोड (भायखळा), लाल बहादूर शास्त्री मार्ग (कुर्ला) तसेच ऐरोली आणि ठाण्यात आहेत. त्यांच्या नावातच टुंडे आहे. हे व काकोरी कबाब त्यांची खासीयत आहे. जोगेश्वरीतील खूपच लोकप्रिय आहे. शिवाय हाजीअलीकडून मुंबई सेंट्रलच्या रस्त्याकडे वळलं की, तिथल्या कॅफे नुराणीमध्ये टुंडे, शामी, नर्गिसी आणि काकोरी कबाब खूपच मस्त मिळतात. भायखळ्यातलं सार्वी रेस्टॉरंट दिसायला फार चांगलं नाही, पण तेथील टुंडे कबाब, काकोरी कबाब आणि सारेच मांसाहारी पदार्थ मस्त आहेत. अंधेरीच्या यारी रोडपाशी लखनवी कबबी नावाचं एक ठिकाण आहे. जोगेश्वरीतच जाफरभाई दिल्ली दरबार आणि पर्शियन दरबारमध्येही टुंडे म्हणजे गिलौटी कबाब मस्त मिळतात. अपोलो बंदर (कुलाबा) भागात कबाब गंजमधील सर्वच कबाब मस्त असतात, पण टुंडे कबाब खास. कांजूरमार्गमध्ये हुमा थिएटरच्या समोर टुंडे कबाब नावाच्या ठिकाणी हे कबाब चांगले मिळतात.

जिथं टुंडे मिळतात अशा बहुसंख्य ठिकाणी काकोरी कबाबही मिळतात. ते अधिक भारी. पाली हिल (वांद्रे) येथील पाली भवनमध्ये हे कबाब मिळू शकतात. ‘लखनवी टुंडे’साठी जशी एकाच नावाची व मालकीची रेस्टॉरंट्स आहेत तसंच काकोरी कबाबच्या बाबतीत आहे. ‘काकोरी हाऊस’ अंधेरी पूर्वेला मरोळ परिसरात आणि पश्चिमेला लिंक रोडवर आहे. माहीमला पूर्वीच्या पॅराडाईज सिनेमासमोर वांद्र्यात वरोडा रोडवर (रणवार) आणि परळ भागात डिलाईल रोडवरही काकोरी हाऊस आहे. याशिवाय वर उल्लेख केलेल्या कॅफे नुराणी, सार्वी, कुलाब्याला बडे मियाँ आणि महात्मा फुले मंडईशेजारच्या जाफरानमध्येही अतिशय उत्तम दर्जाचे काकोरी कबाब मिळतात. सीग कबाबसारखे दिसणारे हे काकोरी कबाब खूपच मुलायम असतात. तसेच सीग कबाबच्या तुलनेत चवीला अधिक उत्तम आणि टुंडेप्रमाणेच सहज खाता येणारे असतात. टुंडे कबाब आपल्यासारख्या सामान्यांना परवडणारे असतात, तर काकोरी काहीसे महाग, पण कधीतरी ऐश म्हणून खावेत असे.
[email protected]