खाद्यतेल भेसळ प्रकरणी अन्न व औषध विभाग अॅक्शन मोडवर, संगमनेरातील किराणा दुकानातून तेलाचे नमुने जमा

संगमनेरमधील तीन खाद्यतेल उत्पादक कंपन्यांतील भेसळीचे प्रकरण समोर आले असून, या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुनील घुले यांनी सोमवारपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संगमनेरमध्ये काही किराणा दुकानांमधून खाद्यतेलाचे नमुने घेतले असून, ते पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संगमनेरमधील बसस्थानक परिसरातील किराणा दुकान तसेच घुलेवाडी परिसरातील एका किराणा शॉपीमधून विक्रीसाठी बाजारात आलेल्या तेलाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. ही कारवाई उशिरापर्यंत सुरू होती.

श्याम ऑइल मिल, भंडारी ऍग्रो आणि एस. व्ही. आसावा यांच्याकडून निर्मिती केल्या जात असलेल्या खाद्यतेलात भेसळ असल्याचा आरोप आहे. तसेच तेलाची पुण्यातील लॅबमध्ये तपासणी करत सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या खाद्यतेल भेसळखोरांविरोधात घुले यांनी वारंवार संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या, निवेदने दिली. मात्र, व्यापाऱ्यांचे प्रस्थ लक्षात घेता, त्यांच्यावर कारवाईचे धाडस प्रशासनातील अधिकारी दाखवू शकले नाहीत, असा आरोप करत घुले यांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे.

घुले यांच्या मागणीकडे वारंवार पाठ फिरवणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज संगमनेरमध्ये उपोषणार्थी घुले यांची भेट घेतली. अन्न भेसळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांच्या मिलवर थेट कारवाई करण्याऐवजी बाजारात किराणा दुकानातून या खाद्यतेलाचे सॅम्पल ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्यांनी शहरात कारवाई सुरू करताच, खाद्यतेल विक्रेत्यांचा गोंधळ उडाला असून, खाद्यतेल बनविणाऱ्या कंपन्यांविरुद्ध तक्रार असताना आमच्या दुकानात येऊन कारवाई कशाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

शहरातील बऱ्याच दुकानांतून संबंधित कंपन्यांचे खाद्यतेल गायब झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान, खाद्यतेल बनविणाऱ्या कंपन्यांच्या चालकांनी, मालकांनी याबाबत मौन बाळगले असून, त्यांच्या वतीने काही एजंट व एक संघटना पुढे आली असून, विनाकारण आरोप-प्रत्यारोपांचे कागदी घोडे नाचू लागले आहेत.

कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा

आमच्या तक्रारीत काही तथ्य नसेल तर आणि पुणे येथील लॅबने दिलेल्या रिपोर्टमध्येही काही तथ्य नसेल तर संबंधित मंडळींनी कायदेशीर कारवाई करण्यास काहीही हरकत नाही. आम्ही चुकीचे आहोत, असे वाटत असेल तर संबंधित लॅब आणि आमच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा असल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. जे काही असेल ते सत्य बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.