सावधान… तुमच्या ताटात भेसळयुक्त सॉस आहे! कामोठ्यातील कंपनीत सुरू होता मिलावटीचा गोरखधंदा

प्रातिनिधिक फोटो

ताटात सॉस किंवा केचअप असेल तर जेवणाची लज्जत आणखीनच वाढते. पण सावधान.. तुमच्या ताटातील सॉस आणि केचअप भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे. रात्रीच्या अंधारात कामोठ्यामधील कुमार फूड्स या कंपनीत दूषित पाण्याचा वापर करून मिलावट सुरू असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून ही बनवाबनवी चव्हाट्यावर आणली असून कंपनीचा मालक राजकुमार राऊत याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कुमार फूड्स या कंपनीत दूषित पाणी व निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून सॉस व केचअप तयार केले जात असल्याची तक्रार अन्न-औषध प्रशासनाकडे दाखल झाली होती. त्यानुसार पथकाने जुलै महिन्यात छापेमारी करून हे कंपनी बंद करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर काही दिवस ही कंपनी बंद होती. मात्र ऑगस्ट महिन्यापासून कंपनीच्या मालकाने बंद कंपनीत रात्री छुप्या पद्धतीने पुन्हा प्रोडक्शन सुरू केले. याची माहिती मिळताच फूड अॅण्ड ड्रग्ज पथकाने मालक राजकुमार राऊत याची चौकशी केली असता त्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रात्री अंधारात लपून छपून सॉस व केचअप तयार करत असल्याची कबुली दिली. त्यानंतर फूड अॅण्ड ड्रग्ज पथकाने आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मालक राजकुमार राऊतविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

नायजेरियन पोलिसांच्या जाळ्यात

एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराष्ट्रीय नायजेरियन तस्कर मुंब्रा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. इफुनी माईक उर्फ केसी असे या नायजेरियन तस्कराचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 1 लाख 65 हजारांचे 55 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले आहे. केसी हा आंतरराष्ट्रीय तस्कर असून त्याच्याविरोधात मुंबईसह अनेक पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.