दाट धुक्यातही रेल्वे धावणार बिनधास्त; ‘फॉग पास डिव्हाइस’ची होणार मदत

हिवाळ्यात धुके जास्त असल्याने रेल्वेगाड्यांच्या वेगावर मर्यादा येतात. मात्र, नवीन धुके सुरक्षा उपकरणाद्वारे (फॉग पास डिव्हाइस) हा अडथळा दूर होणार असून, कमी दृश्यमानता असली, तरी रेल्वेचालकाला साधारण 500 मीटरपर्यंतची सिग्नलची स्थिती समजणार आहे. त्यामुळे धुक्यातही रेल्वेगाड्या सुरळीत धावतील.

रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना हिवाळ्यात अनेक धुक्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. दाट धुक्याचा थेट गाड्यांच्या वेगावर परिणाम होतो. त्यामुळे गाड्यांना नियमित वेळेपेक्षा अनेक तास उशीर होतो. प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थानकावर पोहोचण्याआधीच त्रास सहन करावा लागतो. अनेकदा प्रवाशांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागते. दरम्यान, वाढत्या थंडीत धुक्याचा गाड्यांच्या वेगावर परिणाम होऊ नये, यासाठी रेल्वेने ही व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे, हिवाळ्यात धुक्यामुळे रेल्वे रुळावर दूरवर फक्त धुकेच दिसते. अशा परिस्थितीत लोको पायलटला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या यंत्रामुळे लोको पायलटला मोठा दिलासा मिळणार आहे. हिवाळ्यात दाट धुक्यामुळे रेल्वेगाड्यांचा वेग कमी करावा लागतो.

धुके सुरक्षा उपकरणांमुळे ‘जीपीएस’द्वारे सिग्नलची, लेव्हल क्रॉसिंगची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सुरक्षित आणि वेगवान प्रवास होणार आहे. पुणे विभागात सध्या 80 उपकरणे आहेत.

सुरक्षा उपकरणाचा असा होतो उपयोग…

‘जीपीएस’ तंत्रज्ञानामुळे रेल्वे ट्रॅक नकाशा, सिग्नल, स्थानके आणि रेल्वे क्रॉसिंगची माहिती मिळू शकते. गाडी धावताना लोको पायलटला लेव्हल क्रॉसिंग आणि सिग्नल्सची माहिती देत असते.

गाडी चालविताना जेव्हा लोको पायलटला या यंत्रावरून ट्रॅकवर कोणतीही समस्या आहे की नाही, त्यानुसार गाडी नियंत्रित करू शकतो किंवा वेग वाढवू शकतो

हे उपकरण ‘जीपीएस’ तंत्रज्ञानावर चालते, जे रेल्वेचालकांना पुढील तीन सिग्नल्सबाबत ऑडिओ आणि व्हिज्युअल संकेतांद्वारे सूचना देते.