शारदीय नवरात्र महोत्सवाला आज सुरुवात झाली. पहिल्या दिवशी घटस्थापनेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचा गाभारा आणि मंदिरात फुलांची नयनरम्य आरास करण्यात आली. याकरिता झेंडू, गुलाब, ऍस्टर, शेवंती अशा आठ प्रकारच्या दोन टन पाना-फुलांचा वापर करण्यात आला.नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून श्री विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात, सोळखांबी येथे पानाफुलांचा वापर करून मनमोहक आरास करण्यात आली आहे.
श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात विविध सण, उत्सवकाळात रंगीबेरंगी फुलांचा वापर करून सजावट केली जाते. पुणे येथील भाविक राम जांभूळकर यांनी सेवाभाव म्हणून फुलांची मोफत आरास केली आहे. श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे हे सजलेले अनोखे रूप पाहण्यासाठी भाविक पंढरीत दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. ‘श्रीं’च्या दर्शनाकरिता आलेल्या भाविकांना मंदिरात करण्यात आलेल्या मनमोहक आरासचे दर्शन मिळत असल्याने भाविक मनोमन सुखावले जात आहेत. मंदिर समितीच्या संकेतस्थळावरूनही भाविकांना सुंदर आरासचे दर्शन मिळत आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट केली आहे.