रविवारी दुपारपासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे संगमेश्वर येथील सोनवी नदी व शास्त्री खाडीच्या नेहमीच्या पातळीत वाढ होऊन हा-हा म्हणता संगमेश्वर येथील मच्छी मार्केट, आठवडा बाजार, रामपेठेत पुराचे पाणी घुसू लागल्याने एकच धावपळ उडाली. रविवारी दुपारपासून ढगफुटीसारख्या कोसळणाऱया व तेही कोणतीही विश्रांती न घेता अविश्रांत कोसळणाऱया पावसामुळे येथील सोनवी नदी तसेच शास्त्री खाडीच्या नेहमीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होत जाऊन या दोन्ही नद्यांनी नेहमीची पातळी ओलांडून व या नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने पुन्हा एकदा पुराची भीती निर्माण होऊन ती काही तासांतच सत्यात उतरली. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर देवरुख, कसबा नायरी, डिंगणी-फुणगूस आदी मार्गांवर पुराचे पाणी भरल्याने हे मार्ग बंद पडले आणि अनेक प्रवासी, वाहने अडकून पडली.
जगबुडी आणि नारंगी नदी धोक्याच्या पातळीवर
रविवारी दुपारपासून कोसळणाऱया पावसाने खेड तालुक्याला चांगलेच झोडपले. रात्री 8 च्या सुमारास जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडून पुराचे पाणी शहरातील मार्पेटमध्ये घुसले. तर नारंगी नदीचे पाणी सुर्वे इंजिनिअरिंग जवळ रस्त्यावर आल्याने खेड दापोली, खेड मंडणगड, खेड खादीपट्टयातील वाहतूक ठप्प झाली होती. मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर दुपारपासून बरसणाऱया धुवाधार पर्जन्यवृष्टीमुळे नगर प्रशासनानेही नागरिकांना सतर्पतेचा इशारा दिला. जगबुडी व नारिंगी नद्या दुथडय़ा भरून वाहत होत्या. जगबुडी नदीने सायंकाळी उशिरा इशारा पातळीही ओलांडली. उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरूच होती.
बाजारपेठेतील व्यापाऱयांनी मालाचे नुकसान टाळण्यासाठी माल वेळेत स्थलांतरित केला होता. जगबुडी नदीकिनारी राहणाऱया सफा मस्जिद चौकातील नागरिकांनीही सुरक्षितस्थळी आपले स्थलांतर केले होते. सोमवारी सकाळपासून धोधो कोसळणाऱया पावसाने जगबुडी नदीची पाण्याची पातळी वाढली होती. जगबुडी नदीची इशारा पातळी 5 मीटर आहे. धोका पातळी 7 मीटर आहे. तर सध्याची पातळी 5.75 मीटर आहे.
आचरा पारवाडी, कालावल नद्यांना धोका
रविवार रात्रीपासून मुसळधार पडणाऱया पावसामुळे आचरा पारवाडी, कालावल नद्या धोक्याच्या कक्षेत आल्या असून नदीलगतची घरांना धोका निर्माण झाला होता. मात्र सोमवार सकाळ नंतर पावसाने उसंत घेतल्यामुळे संभाव्य धोका टळला. याबाबत मंडल अधिकारी अजय परब, तलाठी संतोष जाधव, पोलीस नाईक मनोज पुजारे यांनी पूरसदृश स्थिती भागात पाहणी करून संबंधितांना सावधगिरीच्या सूचना दिल्या.
आचरा-पारवाडी नदीच्या देवगड किनाऱयाबाजूने मुळये यांच्या घराला नदीच्या पाण्याचा वेढा पडला होता. पारवाडी येथील केदार शिर्पे, साळसकर आदींच्या घरालगत नदीचे पाणी आले होते, तर चिंदर लब्दे वाडी भागातही काही ठिकाणी अंगणात पाणी आल्याच्या घटना घडल्या होत्या.
राजापुरातील पूर ओसरला नद्यांची पाणीपातळी घटली
सलग तिसऱया दिवशी आज पावसाने रत्नागिरी जिह्याला झोडपून काढले. ढगाळ वातावरण आणि संततधारांमुळे जिह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. जगबुडी, शास्त्राr, अर्जुना, कोदवली या नद्यांची पाणीपातळी घटली आहे. राजापूर शहरातील पूर ओसरला आहे.
रविवारी संध्याकाळी पावसाने जोर धरल्यामुळे खेडमधील जगबुडीनदी, संगमेश्वरमधीत शास्त्राrनदी, राजापुरातील कोदवली आणि अर्जुना नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. राजापुरात पुराचे पाणी शिरले होते. मात्र आज सकाळनंतर नद्यांची पाणी पातळी ओसरली.
रत्नागिरीत शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी
जिह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्या मंगळवार, 9 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिला आहे.
दापोलीत अनेक रस्ते बंद
दापोलीत रविवारी सायंकाळ पासूनच कोसळणाऱया मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अचूक अंदाजानुसार दापोलीत पावसाची रविवारी सायंकाळपासूनच कोसळधार सुरू आहे. या कोसळणाऱया पावसाच्या अतिवृष्टीने येथील नद्या नाले पुराच्या पाण्याने ओसंडून वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यांवर दरडी कोसळून खाली आल्याने तसेच रस्ते वाहून गेल्याने वाहतुक बंद पडली आहे. पाणी घुसल्याने भात शेतीचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अतिवृष्टीमुळे प्रशासनाला तेथवर पोहोचता आलेले नाही. मात्र पाऊस ओसरताच नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील त्यानंतरच निश्चित असा नुकसानीचा आकडा समजणार आहे.