कोल्हापूरात पावसाचा जोर कमी; पण पूरस्थिती कायम

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी पूरसदृश स्थिती अजूनही कायम आहे. राधानगरी धरणाचे केवळ दोनच स्वयंचलित दरवाजे उघडले असून विसर्ग कमी असला तरीही पंचगंगेच्या पातळीत मात्र तीन ते चार तासांनंतर अवघ्या एक इंचाचीच घट होताना दिसत आहे. मध्यरात्री 12च्या सुमारास 47.8 फुटांवर असलेली ही पातळी रविवारी (दि. 28) सायंकाळी पाचच्या सुमारास 47.3 फूट झाली होती.

सांगलीत पाणी ओसरण्यास सुरुवात
जिल्ह्यात आज पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली. अधूनमधून एखाद्दुसरी सर, तर काही भागांत बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. मात्र कृष्णा नदीचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी रात्री इशारापातळी ओलांडून 41.5 फुटांपर्यंत पाणीपातळी गेली होती.