
घराच्या मालकीतील वारसाने कर चुकवल्यास त्याचा फटका बसू शकतो. फ्लॅटमधील त्याच्या हिश्श्यावर जप्ती येऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
वडिलांच्या निधनानंतर आईच्या नावे घर करण्यात आले. यामध्ये तीन मुलांची वारस म्हणून नोंद आहे. यातील एका मुलाने कर चुकवला. त्यानुसार विक्रीकर विभागाने घरातील त्याच्या हिश्श्यावर जप्ती आणली. त्याविरोधात आईने न्यायालयाचे दार ठोठावले.
न्या. अतुल चांदुरकर व न्या. मिलिंद साठये यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. विक्रीकर विभाग केवळ कर चुकवणाऱ्या मुलाच्या घरातील हिश्श्यावर जप्ती आणू शकते. आई व अन्य भावंडांच्या सम भागावर जप्ती आणली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
मुलाचा युक्तिवाद
व्यवसायात नुकसान झाल्याने कर भरू शकलो नाही. घराचे सर्वाधिकार आईकडे आहेत. त्यामुळे आई व घरावर कारवाई करता येणार नाही, असा युक्तिवाद मुलाने केला.
काय आहे प्रकरण…
मालाड येथील हेमलता पांचाळ (80) यांनी ही याचिका केली होती. पतीच्या निधनानंतर आईकडे घराचे हक्क देण्यात आले. त्यांच्या तीन मुलांची घराची वारस म्हणून नोंद होती. त्यांनी आईकडे घराचे हक्क करण्यास संमती दिली. त्यानुसार गृहनिर्माण सोसायटीकडे सदस्य होण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. विक्रीकर विभागाने घरावर जप्ती आणल्याचे सोसायटीने पांचाळ यांना सांगितले. मी घराची मालक आहे. मुलाचा घरावर काहीच अधिकार नाही. मुलाने चुकवलेल्या करासाठी घरावर जप्ती आणली जाऊ शकत नाही, असा दावा करत पांचाळ यांनी याचिका केली होती.
विक्रीकर विभागाचा दावा
वडिलांच्या निधनानंतर घराचा वारस म्हणून मुलाची नोंद आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यानुसार घरातील मुलाच्या हिश्श्यावर जप्ती आणली आहे, असा दावा विक्रीकर विभागाने केला.