फ्लेमिंगोंनी उरणकडे पाठ फिरवली, बदलत्या हवामानाचा परिणाम

उरणमधील जेएनपीटी परिसरातील पाणजे, डोंगरी, गव्हाण- न्हावा, करंजा खाडी- किनारा, पाणथळी जागा आणि जलाशये तुडुंब भरली आहेत. परंतु सातत्याने होत असलेल्या हवामानातील बदलामुळे फ्लेमिंगो पक्ष्यांनी उरणकडे पाठ फिरवली आहे. फ्लेमिंगोंचे दर्शन दुर्मिळ होऊ लागल्याने पक्षीप्रेमींमध्ये निराशेचे वातावरण आहे.

दरवर्षी पावसाळा संपताच हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच परदेशी पक्ष्यांच्या स्थलांतराचा काळ सुरू होतो. या स्थलांतराच्या काळावधीत उरण परिसरातील पाणथळी, जलाशये आणि खाडी किनाऱ्यावर फ्लेमिंगोंसह इतर परदेशी पाहुणे, जलचर पक्षी मोठ्या प्रमाणात उरण परिसरात येतात. पाणथळी आणि जलाशयात खबे, मासे, शेवाळ, कमी, कीटक आदी पक्ष्यांचे आवडते खाद्य विपुल प्रमाणात उपलब्ध असते.

मोठ्या संख्येने येणाऱ्या विविध जातींच्या स्थलांतरित पक्ष्यांनी उरण परिसरात अगदी फुलून, बहरून जातो. विशेषतः स्थलांतरित पक्ष्यांमध्ये हजारो किमी अंतर कापून येणाऱ्या आकर्षक गुलाबी छटा असलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या सर्वाधिक असते. त्यामुळे फ्लेमिंगो पक्ष्यांचे स्वैरपणे हवेत उडणारे थवे, त्यांच्या मोहक, आकर्षक अदा कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पक्षीप्रेमींची उरण परिसरात नेहमीच गर्दी होते. मात्र काही वर्षांपासून फ्लेमोंगोंनी उरणकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

भराव टाकून खाडी बुजवली उरण परिसरात वाढत्या

औद्योगिक पसाऱ्यामुळे विकासाच्या नावाखाली ठिकठिकाणी दगड-मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. यातून पाणथळी जागा आणि जलाशयेही सुटलेली नाहीत. परिसरातील आणि होणाऱ्या प्रचंड भरावात पक्ष्यांची आश्रयस्थाने याआधीच नष्ट झाली आहेत. त्यामुळे उरण परिसरात स्थलांतरित फ्लेमिंगोंसह इतर पक्ष्यांची ही संख्या याआधीच रोडावली आहे. शिवाय हवामानातील बदलांमुळेही फ्लेमिंगो पक्ष्यांनी उरणकडे पाठ फिरवली आहे. पावसाळा संपून डिसेंबर महिना आला तरी फ्लेमिंगो पक्षी उरण परिसरात दिसत नाहीत.