कल्याणमध्ये एका 13 वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना पुण्यात एक संतापजनक घटना घडली आहे. रक्षकच भक्षक बनल्याचा प्रकार उघड झाला आहे. लोणावळ्यातील एका पोलिसाने दारुच्या नशेत चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीला ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नाताळच्या सणानिमित्त पर्यटकांनी विसापूर किल्ल्यावर गर्दी केली होती. यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये नराधम पोलीस सचिन सस्ते देखील तेथे होता. यावेळी त्याने तेथीलच एका हॉटेमधून भाकरी घेतली आणि जेवण केलं. त्या भाकरीचे बिल द्यायला तो पुन्हा हॉटेलजवळ आला, तेव्हा तो दारूच्या नशेत होता. तेव्हा त्याने तेथे एका 5 वर्षाच्या मुलीला खेळताना पाहिले. यावेळी मुलगी एकटीच आहे हे पाहून लघुशंकेच्या बहाण्याने तो हॉटेलच्यामागे गेला. तेथे त्याने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. दरम्यान, मुलीने विरोध केला असता तिला चॉकलेट देऊन कोणालाही सांगू नकोस, असे धमकावले.
मुलीचा आवाज एकून मुलीची आई तातडीेने काऊंटरजवळ आली. तेव्हा त्या मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्या पोलीस काकांनी मला मागं नेलं आणि माझ्या अंतर्वस्त्रांमध्ये हात घातला. असे मुलीने रडत रडत आपल्या आईला सांगितले. मुलीच्या आईने लगेचच मुलीच्या आजीला आणि वडिलांना फोन करून बोलावून घेतले. आणि सगळा प्रकार सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांना बोलावून घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर लगेचच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सचिन सस्ते याला बेड्या ठोकल्या. यावेळी पीडित कुटुंबातील सदस्यांनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. कायद्याचं रक्षण करणारे लोक जर असे गरिबाची छेड काढायला लागले तर आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? असा सवाल त्यांनी केला.