महापालिकेचे पाच हजार शिक्षक निवडणूक डय़ुटीवर

विधानसभा निवडणुकीसाठी पालिकेच्या शिक्षण विभागातील तब्बल पाच हजार शिक्षक इलेक्शन डय़ुटीसाठी जाणार आहेत, तर याआधी ‘बीएलओ’ डय़ुटीसाठी दोन हजार शिक्षक गेले आहेत. त्यामुळे ऐन परीक्षांच्या काळात हजारो शिक्षक निवडणूक डय़ुटीवर गेल्याने शिक्षण विभागावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यामुळे आचारसंहिताही लागू झाली आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात म्हणजे 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या महिना-दीड महिन्यापासून महापालिकेची वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणा विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीत गुंतली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर पालिकेच्या विविध विभागांतील कर्मचाऱयांना निवडणुकीच्या कामासाठी नेमले जात आहे. पालिकेतील सुमारे 1 लाखापैकी 40 ते 50 हजार कर्मचारी, अधिकारी निवडणूक कामाला नेमण्यात आले आहेत. यात पाच हजार शिक्षक निवडणुकीच्या कामाला जाणार आहेत. मुलांच्या परीक्षा याच कालावधीत असल्याने पुढील दोन महिने म्हणजे डिसेंबरपर्यंत तरी शिक्षकांची कमतरता भासणार असून याचा शैक्षणिक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

गरज भासल्यास संख्या वाढवणार

मुंबई महापालिकेच्या एकूण 1195 शाळा आहेत. त्यामध्ये सुमारे 11 हजार शिक्षक आहेत. तर, चार लाख विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. एकूण शिक्षकांपैकी पाच हजार शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. आवश्यक भासल्यास ही संख्या वाढवण्यात येईल, अशी माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱयाकडून देण्यात आली.