आपल्यासोबत आलेला एकही आमदार विधानसभा निवडणुकीत पराभूत झाला तर राजकारण सोडेन, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्या वक्तव्याची आठवण आता मतदार त्यांना करून देत आहेत. शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांपैकी पाच आमदार पराभूत झाले आहेत. त्यामुळे आता राजकारणातून निवृत्ती घेण्याचे धाडस शिंदे यांनी करून दाखवावे, अशी मागणी जनतेमधून होत आहे.
जून 2022 मध्ये शिवसेनेशी गद्दारी करून एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह गुवाहाटी गाठली होती. काही अपक्ष आमदारही त्यांना जाऊन मिळाले होते. त्यातील सदा सरवणकर माहीममधून, भायखळय़ातून यामिनी जाधव, सांगोल्यात शहाजीबापू पाटील, बुलढाण्यातून संजय रायमूलकर आणि उमरगा विधानसभा मतदारसंघातून ज्ञानराज चौगुले पराभूत झाले.
आमचा एकही आमदार आम्ही पडू देणार नाही आणि भाजपचेही 115 आमदार मिळून विधानसभा निवडणुकीत 200 चा आकडा पार करू, तसे झाले नाही तर गावाला जाऊन शेती करेन, असे एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले होते. आता तो शब्द त्यांनी पाळला पाहिजे असे सर्वसामान्यांचे मत आहे.