जम्मू-काश्मीरमधील जनतेसाठी महिला उद्योजकांसाठी पाच लाख बिनव्याजी कर्ज आणि प्रति कुटुंब 25 लाख रुपयांचा आरोग्य विमा यासह पाच वचनांची घोषणा आज काँग्रेसने केली आहे. अनंतनागमधील प्रचार सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, राज्यात सत्तेवर आल्यावर काँग्रेस-नॅश. कॉन्फरन्सचे सरकार महिला कुटुंब प्रमुखांना दर महिन्याला 3 हजार रुपये देईल आणि सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे प्रति व्यक्ती 11 किलो धान्य देण्याची तरतूद पुन्हा लागू करण्यात येईल.
मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात दिलेले काश्मीर पंडित स्थलांतरितांच्या पुनर्वसनाचे आश्वासन आम्ही पूर्ण करू, असेही ते म्हणाले. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि केसी वेणुगोपाल आणि सुबोध कांत यांच्यासह इतर वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्षांनी या पाच वचनांची घोषणा केली. जम्मू-कश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी पक्ष प्रयत्नशील राहील, याचा पुनरुच्चार खर्गे यांनी केला.
मोदी खोटारड्यांचे सरदार- खरगे
आज जम्मू-कश्मीरमध्ये सर्वत्र हल्ले होत आहेत तरीही मोदी खोटे बोलायला मागे हटत नाहीत. कारण ते खोटारड्यांचे सरदार आहेत, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज अनंतनागमध्ये घेतलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला, 400 पारवाले कुठे गेले? ते 240 जागांवरच अडकले. आम्हाला आणखी 20 जागा मिळाल्या असत्या तर हे सर्व लोक तुरुंगात असते, कारण ते लोक तुरुंगात जाण्यास पात्र आहेत, असेही खरगे म्हणाले.