नाशिक पश्चिममधील 5 टक्के व्हीव्हीपॅटची फेरमोजणी होणार, शिवसेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या मागणीला यश

नाशिक पश्चिम मतदारसंघात मतदान झालेल्या ईव्हीएममधील पाच टक्के व्हीव्हीपॅटची फेरमोजणी करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी केली आहे. याबाबत निर्धारित रक्कम भरण्याचे पत्र बडगुजर यांना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले असून त्याची पूर्तता झाल्यानंतर 5 टक्के व्हीव्हीपॅटची फेरमोजणी होणार आहे.

विधानसभा निवडणूक निकालाचे मतदान आणि मतमोजणी यात बऱयाच ठिकाणी मोठी तफावत आहे. विरोधी पराभूत उमेदवारांना त्यांच्या कुटुंबातील, प्रभागातील आणि गावातील मतदानसुद्धा झालेले नाही. ईव्हीएममध्ये सत्ताधाऱयांनी सोयीनुसार केलेली फेरफार, घोटाळा चव्हाटय़ावर येत आहे. नाशिक पश्चिममध्ये शिवसेना उमेदवार सुधाकर बडगुजर यांना त्यांच्या मतदारसंघात अनेक ठिकाणचे खात्रीशीर मतदानसुद्धा अपेक्षेप्रमाणे झालेले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झालेल्या मतदानाच्या पाच टक्के व्हीव्हीपॅटची फेरमोजणी करावी, अशी मागणी बडगुजर यांनी केली आहे.

सुधाकर बडगुजर यांच्या मागणीनंतर प्रतियुनिट चाळीस हजार रुपये आणि जीएसटी अशी रक्कम भरावी, असे पत्र जिल्हाधिकाऱयांनी बडगुजर यांना दिले आहे. ते पत्र प्राप्त झाले आहे. लवकरच ही पूर्तता करण्यात येईल, कोणत्या व्हीव्हीपॅटच्या मतांची फेरमोजणी करायची हे ठरविण्यात येईल, असे बडगुजर यांनी सांगितले.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सीमा हिरे या विजयी झाल्या आहेत. त्यांना 1 लाख 40 हजार 773 मते मिळाली आहेत.

शिवसेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचा पराभव झाला. ते दुसऱया स्थानावर राहिले. त्यांना 72 हजार 661 मते मिळाली असून मनसेचे दिनकर पाटील यांना 46 हजार 390 मते मिळाली आहेत. या निकालावर सुधाकर बडगुजर यांच्यासह दिनकर पाटील यांनीही आक्षेप घेतला आहे.