छत्तीसगडमध्ये चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमधील विजापूर जिह्यात आज सकाळी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. मृतांमध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. इंद्रावती नॅशनल पार्कच्या बांदोपारा-कोरंजेड बफर झोनमध्ये ही चकमक झाली. जवानांनी अनेक शस्त्रे आणि स्फोटके जप्त केली. दुपारी 4 वाजेपर्यंत चकमक सुरू होती. सुरक्षा दलाच्या हल्ल्यांनी नक्षलवाद्यांनी पळ काढला, असे पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी सांगितले. या महिन्यात छत्तीसगडमधील वेगवेगळय़ा भागात आतापर्यंत 13 नक्षलवादी मारले गेले आहेत, तर नक्षलवाद्यांच्या दोन वेगवेगळय़ा हल्ल्यांमध्ये आतापर्यंत नऊ जवानांचा मृत्यू झाला आहे.