पुण्यात झिकाचा धोका कायम; रुग्णसंख्या पोहोचली 11 वर, पाच गर्भवतींनाही संसर्ग

पुणे शहरामध्ये झिका विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरामध्ये आणखी 5 जणांना झिका विषाणूची लागण झाल्याची माहिती पुणे महानगर पालिकेने शनिवारी दिली. यामुळे पुण्यात झिका विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 11 वर पोहोचली असून यात पाच गर्भवतींचाही समावेश आहे.

पुण्यात झिका विषाणूचा शिरकाव कसा झाला याचा शोध सुरू आहे. मात्र झिकाची लागण झालेला पहिला रुग्ण 20 जून रोजी आढळून आला होता. शनिवारी आणखी पाच जणांना झिकाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यात मुंढवा, पाषाण आणि आंबेगाव येथील तीन गर्भवती महिलांचा समावेश आहे.

याआधी एरंडवणे येथील दोन गर्भवतींना झिकाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे आतापर्यंत झिकाची लागण झालेल्या गर्भवतींची संख्या पाचवर पोहोचली आहे, असे पुणे महानगर पालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी सांगितले.

दरम्यान, सूर्या मदर अँड चाईल्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार प्रसुती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वर्षाली माळी म्हणाल्या की, झिकामुळे गर्भधारणेदरम्यान नवजात बालकामध्ये गंभीर जन्मदोष निर्माण होऊ शकतात. तसेच अकाली जन्म किंवा गर्भपात, याशिवाय नवजात बालकांमध्ये मायक्रोसेफली व इतर जन्मजात विकृतीही निर्माण होऊ शकतात.

डेंग्यू आणि चिकुनगुनियाप्रमाणे झिका हा एडिस डासांद्वारे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. तथापि, ‘झिका’ची लागण झालेल्या गर्भवती महिलांच्या पोटी जन्मलेल्या बाळांना डोक्याचा आकार कमी (मायक्रोसेफली) झालेला असतो, जो एक प्रमुख चिंतेचा विषय बनला आहे. हिंदुस्थानात 2016 साली पहिल्यांदा गुजरातमध्ये झिकाचे पहिले प्रकरण समोर आले होते. त्यानंतर तामिळनाडू, मध्यप्रदेश, राजस्थान, केरळ, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, दिल्ली आणि कर्नाटकासहित अन्य राज्यांतून या आजाराच्या संक्रमणाची प्रकरणे समोर आली.

झिका विषाणूची लक्षणं

झिका विषाणूची लागण झालेल्या 5 पैकी एकाच व्यक्तीमध्ये याची लक्षणे दिसतात. या विषाणूने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये ताप, सांधेदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे इत्यादी लक्षणे दिसतात.