गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी पाच सदस्यीय समिती स्थापन; केडीएमसी करणार चौकशी

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शक्तिधाम रुग्णालयात उपचार सुरू असताना शांतीदेवी मौर्या (30) या गर्भवती महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे शांतीदेवीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. कुटुंबीयांच्या आरोपाची दखल घेत केडीएमसी प्रशासनाने पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. समितीच्या अहवालातून नेमके सत्य बाहेर येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली.

शांतीदेवीचा मृतदेह जे. जे. रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्रातून परत कल्याणमध्ये आणण्यात आला. मात्र रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन करत जबाबदार डॉक्टरांवर गुन्हा दाखल होईपर्यंत अंतिम संस्कार न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर महापालिकेचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि कोळसेवाडी पोलिसांनी मौर्या कुटुंबीयांशी चर्चा करत सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतरच कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारला आणि रात्री उशिरा कल्याण पूर्व येथील स्मशानभूमीत शांतीदेवी मौर्या यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अहवालाकडे लक्ष
शांतीदेवी मौर्या यांचा मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी महापालिकेमार्फत अंतर्गत पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. उपचारादरम्यान काही त्रुटी किंवा हलगर्जीपणा झाला का, याची तपासणी समितीमार्फत केली जाईल व त्यानंतर अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांना सादर केला जाईल.