
रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा तसेच ओव्हरहेड वायरच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत हा ब्लॉक असेल.
सध्या लग्नसराई सुरू झाल्याने लग्नसमारंभ तसेच खरेदीसाठी लोकल प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची जम्बो ब्लॉकमुळे मोठी गैरसोय होणार आहे. ब्लॉक काळात सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. या जलद मार्गावरील लोकल गाडय़ा ब्लॉक अवधीत सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. तसेच काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या असून काही अंधेरी आणि बोरीवली गाडय़ा गोरेगावपर्यंत हार्बर मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आल्यामुळे रविवारी पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.