पुण्यात पावसाचा हाहाकार; पाच बळी, सोसायट्यांना पाण्याचा वेढा, 4175 जणांचे स्थलांतर

पुणे शहर आणि धरणक्षेत्रात बुधवार रात्रीपासून पावसाचे तांडव सुरू आहे. त्यातच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे पुण्यातील सिंहगड रस्त्यासह नदीकाठच्या भागांमध्ये अनेक सोसायट्या, घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. नाले, रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. पावसाच्या या हाहाकारामुळे पुण्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या वेढ्यात अडकलेल्या आपल्या घरातील चिमुरड्यांना अक्षरशः खांद्यावर घेऊन कंबरे इतक्या पाण्यातून मार्ग काढावा लागला. नदीकाठ लगतच्या परिसरात आपला जीव वाचवण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरू होती. अनेक वाहनेही पाण्याखाली बुडाली. शुक्रवारी रात्री पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने सिंहगड रस्त्यासह नदीकाठच्या परिसरातील तब्बल ४ हजार 175 नागरिकांचे महापालिकेने विविध ठिकाणी स्थलांतर केले. तर, पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला.

अजित पवारांसमोर तक्रारींचा पाढा

पुण्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकता नगर परिसरात भेट दिली. यावेळी नागरिकांनी येथील अडणचणींचा पाढा त्यांच्यासमोर वाचून दाखवला. तर याच परिसरात एका महिलेने थेट महापालिका आयुक्तांनाच धारेवर धरले. धरणातून पाणी सोडणार हे आम्हाला आधीच का सांगितले नाही असा जाब एका महिलेने विचारला.

शॉक लागून तिघांचा मृत्यू

गुरुवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास भिडे ब्रिज परिसरातील शेड ब्रिजखाली पाणी पातळी वाढली. पाणी पातळी वाढल्याने तेथील अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी तिघेजण गेले. स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवताना अचानक विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अभिषेक घाणेकर (25), आकाश माने आणि शिवा परिहार (18) यांचा समावेश आहे.

कृष्णा, कोयना काठी धोका वाढला अतिवृष्टीमुळे कोयना धरणातून 10 हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू करण्यात आला होता. त्यामुळे नदीकाठच्या गावांचा धोका वाढला. लवासामध्ये दोन व्हीलावर दरड कोसळली मुळशी तालुक्यातील लवासा लेक सिटीमध्ये दरड कोसळून दोन व्हीला (बंगले) गाढले गेले. यामध्ये दोन व्यक्ती बेपत्ता असून एकजण जखमी झाला आहे.

एनडीआरएफ, लष्कराचे मदतकार्य

शहरातील पुरस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर प्रशासनाने एनडीआरएफ आणि लष्कराची मदत घेतली. एनडीआरएफचे शहरात 85 जवान, लष्कराचे जवान मदतकार्यासाठी तैनात करण्यात आले होते. या दोन्ही टीमने पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांची सुटका केली.

कोल्हापूर महापुराच्या कचाट्यात

पावसाचा जोर कायम राहिल्याने गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास पंचगंगा नदीने 43 फुटांची धोका पातळी गाठली. पाठोपाठ राधानगरी धरण शंभर टक्के भरल्याने आज सकाळी 10.05 वाजता धरणाचा 6 व्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला. तर, सायंकाळपर्यंत पाच दरवाजे उघडले. धरणातून सध्या 8 हजार 640 क्युसेक्स इतका विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. याशिवाय वारणा, दूधगंगा, कासारी आदी घरण प्रकल्पांमधूनही विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होताना दिसत आहे. सायंकाळी 7 वाजेपर्यंत पंचगंगेची पातळी 43.5 फूट झाली होती.

गणेशोत्सव मंडळे मदतीला धावली

पुण्यातील निंबज नगरमधील सर्व गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीला धावले. अनेकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढत कार्यकर्त्यांनी धीर दिला. दरम्यान, मुंबईतील पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन सर्व गणेशोत्सव मंडळे मदतकार्यांसाठी सज्ज झाली आहेत, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

8 बोटी आणि बचाव पथके तैनात

पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे धारण क्षेत्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वच नदी, नाले, रस्ते ओसंडून वाहत आहेत. पुणे महापालिकेने 8 बोटी आणि बचाव पथके मदातकार्यासाठी नियुक्त केल्या आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांना खाद्य पदार्थ व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

पुणे बुडाले

गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर भाजपने मुळा-मुठा नदीच्या सुशोभीकरण प्रकल्पाच्या नावाखाली नदीमध्ये भराव टाकून सुशोभीकरणाच्या नावाखाली नदीचे पात्र अरूंद केले. परिणामी दोन दिवसाच्या पावसांत बंडगार्डन येथे अरूंद प्रवाहाच्या फुगवट्याने पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले. पुणेकरांचे जनजीवन उद्ध्वस्त होण्यास केवळ भाजप जबाबदार असल्याची टिका पर्यावरणतज्ज्ञांसह विविध राजकीय पक्षांकडून केली जात आहे.

भाजपने नदी सुधार प्रकल्पआणला असून नदीपात्रात बंडगार्डन ते मुंढवा दोन्ही बाजूने 150 फुट आत काम करत आहेत. त्याशिवाय १०० फुट रूंदीचा रस्ता नदीपात्रात भर घालून करत आहेत. हा पुर्णपणे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अजेंडा आहे. साबरमती प्रकल्पाचे सल्लागारच देशभरात विविध रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटचे काम करत आहे. याची किंमत पुणेकरांना मोजावी लागणार आहे.

सारंग यादवाडकर, पर्यावरण अभ्यासक.

पुण्यात नैसर्गिक प्रवाह, नाल्यांचा प्रवाहावर बांधकामे झाली आहेत. जिथे नाला तो नकाशावर दाखवला नाही. अनेक नाल्यावर महापालिकेचे रस्ते, मोठमोठे प्रकल्प उभे राहिले आहेत. काही ठिकाणी नाले वळविले आहेत. पुण्याचे नगरनियोजन पुर्णपणे चुकलेले असून स्थानिक अधिकाऱ्यांचे 40 ते 50 वर्षांचे हे पाप आहे.

महेश झगडे, माजी आयुक्त, महापालिका, पुणे.

रिव्हर फ्रंट नदी सुधार योजनेच्या नावाखाली नदीमध्ये भराव टाकून सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयाचा चुराडा केला आणि टक्केवारी खाउन सत्ताधारी निगरगट्ट झाले.

संजय मोरे, शहरप्रमुख, शिवसेना