कुनो नॅशनल पार्कमधील पाच चित्त्यांवर हल्ला; गावकऱ्यांची दगड-काठ्यांनी मारहाण

मध्य प्रदेशात कुनो राष्ट्रीय उद्यानातून बाहेर पडलेल्या पाच चित्त्यांवर ग्रामस्थांनी काठ्या आणि दगडांनी हल्ला केला. एका चित्त्याने गायीवर हल्ला केला तेव्हा गावकऱ्यांनी त्याच्यावर दगडफेक केली. या घटनेचा एक व्हिडीआ समोर आला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या वन विभागाच्या बचाव पथकाने ग्रामस्थांना चित्त्यांपासून दूर राहण्यास सांगितले, परंतु त्यांनी ऐकले नाही. ही घटना सोमवारी सकाळी घडली.

21 फेब्रुवारी रोजी ज्वाला आणि तिच्या पिल्लांना खजुरी परिसरातील जंगलात सोडण्यात आले होते. मादी चित्ता ज्वाला आणि तिची चार पिल्ले शनिवारी संध्याकाळी पहिल्यांदाच उद्यानाच्या हद्दीतून बाहेर पडली. रविवारी दुपारी चित्ते पुन्हा कुनो जंगलात परतले. रविवारी रात्री वीरपूर तहसीलमधील श्यामपूर गावाजवळ हे चित्ते दिसले. ते बांधकामाधीन शेओपूर-ग्वाल्हेर ब्रॉडगेज रेल्वे ट्रकपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर होते. सोमवारी सकाळी हे पाच चित्ते कुनो सायफॉन मार्गे कुनो नदीत पोहोचले. बांधकाम सुरू असलेल्या रेल्वे पुलाखाली ते बराच वेळ बसून राहिले. यावेळी, कुनो सिफॉनमधून जाणाऱ्यांची गर्दी चित्त्यांना पाहण्यासाठी जमली. मादी चित्ता आणि  तिच्या पिल्लांनी  रस्ता ओलांडताना गायीवर झडप घातली. मादी चित्ता आणि तिच्या पिल्लांना हाकलून लावण्यासाठी गावकरी काठ्या घेऊन धावले आणि दगडफेक करायला सुरुवात केली. चित्ता ज्वालाने गायीच्या मानेला बराच वेळ धरून ठेवले. दगडफेक आणि लोकांच्या ओरडण्याने ज्वालाने गायीला सोडून दिले आणि ती आपल्या पिलांसह पळून गेली.