बिहारमध्ये डबल इंजिन सरकारला गेल्या 11 दिवसांपासून सातत्याने हादरे बसत आहेत. 11 दिवसांत तब्बल पाच पूल कोसळले. पाचवा पूल निर्माणाधीन होता. मधुबनी येथील भुताही नदीवर बांधण्यात येत असलेला पूल कोसळल्यामुळे बिहारमध्ये निर्माणाधीन असलेल्या इतर पुलांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. भविष्यात पूर्णपणे बांधून झालेला पूलही कोसळू शकतो आणि मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते, असे तज्ञांनी म्हटले आहे.
याआधी गुरुवारी किशनगंज जिह्यातील 70 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद पूल कोसळला. मुसळधार पावसात हा पूल तग धरू शकला नाही. हा पूल 2011 मध्ये बांधण्यात आला होता. महानंदा येथील कनकई नदीला जोडणारा हा पूल कोसळला. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याचा दबाव पुलाचा एक खांब झेलू शकला नसल्यामुळे हा पूल कोसळल्याचे जिल्हा महानगर दंडाधिकारी तुषार सिंगला यांनी सांगितले. त्यापूर्वी अररीया, सिवान आणि पुन्हा अररीया येथे पूल कोसळल्याच्या तीन घटना गेल्या आठवडय़ात घडल्या.