गडचिरोलीत निवडणूक प्रक्रियेसाठी लष्कराची पाच हेलिकॉप्टर

गडचिरोलीत निवडणूक प्रक्रियेसाठी वायुसेना आणि लष्कराची पाच एमआय-17 हेलिकॉप्टर आली आहेत. रविवार सकाळपासून अहेरी येथे वायुसेनेच्या एमआय-17 हेलिकॉप्टरद्वारे विधानसभा मतदारसंघाच्या 76 मतदान केंद्रांवरील मतदान कर्मचाऱयांचे हेलीड्रॉपिंग येथून सुरू झाले. ईव्हीएम  आणि सर्व मतदान कर्मचारी पोलीस ठाण्यांवरील 14 बेस कॅम्पवर ड्रॉप केले जात आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

बेस कॅम्पवरून 19 नोव्हेंबर रोजी सुरक्षा रक्षकांच्या गराडय़ात कर्मचारी अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर जाणे-येणे अशी 30 ते 35 किमी पायपीट करतील. या वेळी सोमवारची रात्र जंगलातच काढावी लागेल. काही केंद्रांवर 10 ते 15 किमी पायपीट करावी लागेल. 19 तारखेपर्यंत गडचिरोलीमध्ये ईव्हीएम आणि मतदान कर्मचाऱयांचे हेलीड्रॉपिंग चालू राहील. गडचिरोली जिह्यात एकूण 972 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. यांपैकी 458 मतदान केंद्रांवर बेस कॅम्पहून पायी जावे लागते, तर मतदान केंद्रांवर ईव्हीएमची ने-आण चॉपरने होणार आहे.

गडचिरोली जिल्हा जवळपास 76 टक्के जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्षल समर्थित लोक आश्रय घेतात. जिह्याची एकूण लोकसंख्या 10 लाख 72 हजार 942 असून जनगणनेनुसार पुरुष व स्त्रिया यांची लोकसंख्या अनुक्रमे 5 लाख 41 हजार 328 व 5 लाख 31 हजार 614 याप्रमाणे आहे. जिह्यात अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या अनुक्रमे 1 लाख 20 हजार 745 व 4 लाख 15 हजार 306 एवढी आहे. जिह्याची एकूण साक्षरता 74.4 टक्के आहे. अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्येची टक्केवारी 11.25 टक्के व 38.7 टक्के अनुक्रमे आहे.