श्रीलंकेमध्ये खितपत पडलेल्या मच्छीमारांची केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सुटका करावी, यासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी विदेश मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहिले आहे. मच्छीमारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी सुद्धा केंद्र सरकारने पावले उचलावीत, असेही स्टॅलिन यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. श्रीलंकेच्या नौदलाने रामेश्वरमच्या 17 मच्छीमारांना अटक केली आहे. 2024 मध्ये जवळपास 530 हिंदुस्थानी मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने अटक केली आहे.
दक्षिण कोरिया बनला वृद्धांचा देश
दक्षिण कोरिया वयोवृद्धांचा देश बनला आहे. दक्षिण कोरियात 20 टक्क्यांहून अधिक जनता ही 65 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे. देशात 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या आता 10.24 मिलियनपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच ही संख्या एकूण लोकसंख्येच्या 51.22 मिलियन म्हणजेच 20 टक्के आहे. लोकसंख्येच्या तुलनेत 14 टक्क्यांपेक्षा जास्त असलेली 65 वर्षांवरील संख्या असेल तर तो देश वयोवृद्धांचा देश समजला जातो. दक्षिण कोरियात गेल्या काही दिवसांपासून वृद्ध व्यक्तींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
इंडिगोतून करा स्वस्तात प्रवास; कंपनीची भारी ऑफर
इंडिगोने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी ‘गेटअवे सेल’ची घोषणा केली आहे. या माध्यमातून प्रवाशांना खास सवलत दिली जाईल. उद्या, 25 डिसेंबरपर्यंत या सेलचा लाभ घेता येईल. प्रवासी 23 जानेवारी ते 30 एप्रिल 2025 पर्यंतचे तिकीट बुक करू शकतात. देशांतर्गत प्रवासाचे भाडे 1,119 रुपयांपासून सुरू होते तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी किमान 4,499 रुपये मोजावे लागतील. याशिवाय इंडिगो विविध सुविधांसह इतर सवलती देत आहे. दरम्यान, प्रवाशांनी फेडरल बँकेच्या क्रेडिट कार्डने बुक केल्यास देशांतर्गत प्रवासात 15 टक्के तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 10 टक्के सूट मिळेल. ही ऑफर 31 डिसेंबर 2024 पर्यंत वैध असेल. अधिक माहिती इंडिगोच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.