देवगड तालुक्यातील मुरमणेवाडा येथील मच्छिमाराचा बुडून मृत्यू

देवगड तालुक्यातील तारामुंबरी मुरमणेवाडा येथील संतोष तुकाराम सारंग या मच्छिमाराचा तारामुंबरी खाडीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (2 मार्च 2025) रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे सारंग कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष सारंग हे रविवारी शिंपले काढण्यासाठी तारामुंबरी खाडीपात्राकडे गेले असताना त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती ग्रामस्थांनी देवगड पोलिसांनी दिली. त्यानंतर देवगड पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजन जाधव, हवालदार गणपती गावडे, पोलीस नाईक स्वप्नील ठोंबरे, संतोष नाटेकर यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण तारी, देविदास परब, धर्मराज जोशी, अमोल जोशी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले की, संतोष सारंग याला फिट येण्याचा आजार होता. त्यांच्यावर औषधोपचारही सुरू होते.

शवविच्छेदनासाठी मृतदेह देवगड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेची फिर्याद संतोष सारंग याचा भाऊ ज्ञानेश्वर तुकाराम सारंग यांनी देवगड पोलिसांना दिली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड पोलीस करत आहेत. दरम्यान, संतोष सारंग याच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या आकस्मिक निधनामुळे सारंग कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.