दुसऱ्या पत्नीसोबत राहणाऱ्या नवऱ्याला पहिल्या पत्नीने पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तर मेहुण्याने कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही खळबळजनक घटना पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे घडली असून, शेजारच्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे दोन बायकांच्या या दादल्याचा जीव वाचला आहे.
18 रोजी रात्री उशिरा हा प्रकार घडला. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात जखमी पतीने दिलेल्या फिर्यादीवरून पहिली पत्नी, मेहुणा व सासरा अशा तिघांविरुद्ध विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी पती विठ्ठल जालिंदर पितळे (रा. विहामांडवा, ता. पैठण) यांच्यावर उपचार सुरू आहेत. विहामांडवा येथील शिवाजीनगर भागात विठ्ठल जालिंदर पितळे हे दुसऱ्या पत्नीसोबत राहतात. गंगामसला (ता. माजलगाव, जिल्हा बीड) येथील पहिली पत्नी गीता हिच्या सोबत त्यांचे पटत नसल्याने त्यांनी दुसरे लग्न केले. यापूर्वीही त्यांच्यात कलह होऊन प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले होते. दोघांच्या भांडणाची तक्रारही पोलीस ठाण्यात दाखल आहे.
या पार्श्वभूमीवर रात्री अकराच्या सुमारास पत्नी गीता, सासरा ज्ञानोबा धरपडे व मेहुणा नारायण ज्ञानोबा धरपडे व अन्य दोघे कोयता तसेच पत्नी गीता हिने हातात पेट्रोलची कॅन घेऊन विहामांडवा येथील विठ्ठल पितळे यांच्या घरी आले. सुरुवातीला शिवीगाळ करून धमक्या दिल्या. पहिल्या पत्नीला नांदवत का नाही ?असा जाब विचारत कोयत्याने वार केले. गीताने पतीच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी भांडणाचा आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेतली. अन्य ग्रामस्थांनीही पतीची सुटका केली. घटनेची माहिती पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांना दिली. यानंतर तत्काळ विहामांडवा चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राम बाराहाते, जमादार किशोर शिंदे यांनी घटनास्थळी येऊन जखमी विठ्ठल पितळे यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पत्नी, सासरा, मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.