छत्तीसगड-झारखंड सीमेवर असलेल्या बलरामपूर जिह्यातील चुंचुना गावात स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतर प्रथमच पाणी आल्याने ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. जलजीवन अभियानांतर्गत गावातील सर्व 105 घरांना स्वतंत्र नळ देण्यात आले आहेत. त्यामुळे गावातील लोकांना अखेर शुद्ध पाणी मिळू लागले आहे. विशेष म्हणजे हे गाव मोठय़ा कालावधीपासून नक्षलवाद्यांच्या प्रभावाखाली आहे. सीमावर्ती भाग असल्यामुळे संबंधित गाव शासकीय योजनांपासून वंचित राहत असे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर जावे लागत होते. अखेर हंडाभर पाण्यासाठी होत असलेली गावकऱ्यांची वणवण थांबली आहे.
ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी परिसरात तीन वेगवेगळय़ा ठिकाणी सुरक्षा दलाच्या छावण्या उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे नक्षलवाद्यांना आळा बसला असल्याचे ग्रामस्थ सांगतात. जलजीवन अभियानामुळे पाण्याचा प्रश्न तर सुटलाच, याशिवाय नक्षलग्रस्त भागात विकासाला गती मिळत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. सुरक्षा दलाच्या जवानांचा ताफा सतत गस्तीवर असल्यामुळे नक्षलवाद्यांची पीछेहाट झाली.
जिल्हा अधिकारी पंकज जैन यांनी सांगितले की, चुंचुना गावातील पाण्याचे संकट अखेर दूर झाले आहे. तसेच जिह्यातील इतरही दुर्गम भागातील गावांमध्ये प्रत्येक घरापर्यंत नळ पोहोचवण्याचे काम सुरू आहे. आगामी काळात जिह्यातील सर्व गावांना शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल.