या वर्षी प्रथमच आषाढी एकादशीनिमित्त नाशिकच्या गोदातीरावरून 15 जुलै रोजी साहित्यिकांची वारी निघणार आहे. हाती साहित्यकृती घेऊन ते पंढरपूरला जाणार असून, विठ्ठलरायांच्या चरणी आपल्या साहित्यकृती अर्पण करणार आहेत, अशी माहिती गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्यासह साहित्यिकांनी दिली. पंढरपूर येथील विठूमाऊली हे लाखो वारकऱयांचे श्रद्धास्थान आहे. या गोजिऱया रूपाच्या दर्शनाची आस प्रत्येकाला असते. यानिमित्त नाशिक येथून प्रथमच ‘साहित्यिकांची वारी; पांडुरंगाच्या दारी’ हा उपक्रम राबवला जात आहे. गिरणा गौरव प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंच, वैशाली प्रकाशन, तन्मय प्रकाशन, पुस्तकावर बोलू काही यांच्या वतीने ही साहित्यवारी निघणार आहे. हातात टाळ-मृदंगाऐवजी साहित्यकृती घेऊन हे वारकरी निघतील. गोदातीरी आरती करून 15 जुलै रोजी या वारीचा शुभारंभ होईल. हे सर्वजण वाखरी येथून पायी पंढरपूरला जाणार आहेत. सर्व साहित्यिकांच्या पुस्तकाची एक प्रत विठ्ठलचरणी अर्पण केली जाणार आहे. या वारीत जिह्यातील जवळपास 350 साहित्यिक सहभागी होणार आहेत.