अखेर पाकिस्तानी खो-खो संघांना केंद्र सरकारने व्हिसा नाकारल्यामुळे पहिल्यावहिल्या खो-खो वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध रंगणार नाही. अस्सल मऱ्हाटमोळय़ा देशी खेळाच्या पहिल्यावहिल्या वर्ल्ड कपमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्ताननेही खेळावे, अशी इच्छा तमाम खो-खो संघटकांची होती. त्यासाठी गेले दोन आठवडे जोरदार प्रयत्नही केले जात होते. मात्र त्यांच्या प्रयत्नांना व्हिसाचे यश न लाभल्यामुळे पहिलावहिला खो-खो वर्ल्ड कप पाकिस्तानशिवायच खेळला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध अस्थिर असल्यामुळे हिंदुस्थानी सरकारने पाकिस्तानी पुरुष आणि महिला संघांना व्हिसा देण्यास नकार दर्शवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हिंदुस्थानी खो-खो संघटनेने अखेर वर्ल्ड कपचा कार्यक्रम आज जाहीर केला. येत्या 13 ते 19 जानेवारीदरम्यान नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर खो-खोचा हा जागतिक थरार रंगणार आहे. या स्पर्धेत पुरुष गटात 20 तर महिला गटात 19 देशांचे संघ आपले काwशल्य दाखवतील.
गेली चार दशकांपासून खो-खोला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी राज्यातील खो-खोप्रेमी मेहनत घेत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश लाभले असून खो-खोच्या लीगनंतर खो-खोच्या वर्ल्ड कपचाही थरार रंगणार आहे. दोन्ही प्रकारात संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली असून पुरुष गटात हिंदुस्थानचा संघ ‘अ’ गटात आहे. या गटात नेपाळसह पेरू, ब्राझील, भूतान या संघांनाही स्थान देण्यात आले आहे. महिलांच्या गटात हिंदुस्थानसह इराण, मलेशिया आणि दक्षिण कोरिया हे संघ खेळणार आहेत. पुरुष गटात हिंदुस्थानचा सलामीचा सामना 13 जानेवारीला नेपाळशी रंगेल. त्यानंतर ब्राझील, पेरू आणि भूतानविरुद्ध भिडेल. स्पर्धेच्या प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत धडक मारतील. उपांत्यपूर्व फेरीचे सामने 17 जानेवारीला, 18 जानेवारीला उपांत्य फेरीच्या लढती खेळविल्या जातील आणि 19 जानेवारीला अंतिम सामना खेळला जाणार आहे.
खो–खो विश्वचषकाची गटवारी (पुरुष)
n ‘अ‘ गट ः हिंदुस्थान, नेपाळ, पेरू, ब्राझील, भूतान n ‘ब’ गट ः द.आफ्रिका, घाना, अर्जेंटिना, नेदरलॅण्ड्स, इराण n ‘क’ गट ः बांगलादेश, श्रीलंका, द. कोरिया, अमेरिका, पोलंड n ‘ड’ गट ः इंग्लंड, जर्मनी, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, केनिया.
खो–खो विश्वचषकाची गटवारी (महिला)
n ‘अ’ गट ः हिंदुस्थान, मलेशिया, इराण, द. कोरिया. n ‘ब’ गट ः इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, केनिया, युगांडा, नेदरलॅण्ड्स. n ‘क’ गट ः नेपाळ, भूतान, श्रीलंका, जर्मनी, बांगलादेश n ‘ड’ गट ः द. कोरिया, न्यूझीलंड, पोलंड, पेरू, इंडोनेशिया