मुंबईकरांची चिंता वाढली! पवईत आढळला HMPV चा पहिला रुग्ण

देशभरात (HMPV) हा व्हायरस झपाट्याने वाढताना दिसत आहे. गुजरात, पुणे, नागपूरनंतर आता मुंबईतही ह्युमन मेटाप्युमो व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. पवईमधील हिरानंदानी परिसरात एका सहा महिन्यांच्या बाळाला या विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खोकला आणि ऑक्सिजनची पातळी 84 टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याने या बाळाला 1 जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर केलेल्या वैद्यकीय चाचणीदरम्यान बाळाला लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या बाळावर आयसीयूमध्ये ब्रॉन्कोडायलेटर्सच्या लक्षणांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

HMPV सहसा फक्त लहान मुलांमध्ये आढळतो. सर्व फ्लू नमुन्यांपैकी 0.7 टक्के HMPV चे असतात. तसेच, या व्हायरसचा स्ट्रेन अद्याप समजलेला नाही. आरोग्य तज्ज्ञांनी या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणतीही भीती बाळगू नका, योग्य ती काळजी घ्या, असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.