कोकणातून आंबा आला रे…! वाशी मार्केटमध्ये केशर आंब्याची पहिली पेटी दाखल

नववर्ष उजाडले की मुंबईकरांना सर्वप्रथम ओढ लागते ती ‘फळांचा राजा’ असलेला हापूस तसेच केशर आंब्यांच्या आगमनाची. यंदा कोकणातील आंब्याने मुंबईत लवकर एंट्री मारली आहे. कोकणातून रवाना केलेली केशर आंब्यांची पहिली पेटी रविवारी वाशी मार्केटमध्ये दाखल झाली. पेटीची रीतसर पूजा करून यंदाच्या हंगामाचा मुहूर्त करण्यात आला.

कोकणातील आंब्याची सर्वांनाच ओढ लागलेली असते. दरवर्षी वाशी येथील बाजार समितीत आंब्याची पहिली पेटी दाखल होते. यंदाच्या हंगामात केशर आंब्यांच्या पहिल्या पेटीची रविवारी वाशी बाजार समितीत विक्री करण्यात आली. कोकणातून आलेली ही पहिलीच आंब्याची पेटी. त्यामुळे मुहूर्त केल्यानंतर अवघ्या काही क्षणांत आंब्याने चांगला भाव मिळवला. बाजार समितीतील फळ व्यापारी संजय पानसरे यांनी केशर आंब्याच्या पहिल्या पेटीच्या विक्रीची खूशखबर दिली. सिंधुदुर्ग जिह्यातील वाघोटण, तालुका देवगड येथील आंबा उत्पादक शेतकरी शकील मुल्ला यांच्या बागेत तयार झालेली पाच डझनाची केशर आंब्याची पेटी एन. डी. पानसरे अॅण्ड सन्स या दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आली. यावेळी पेटीची रीतसर पूजा करण्यात आली. यापुढे कोकणातून हापूस व केशर आंब्याची आवक हळूहळू होत राहील. आंब्याचा मुख्य हंगाम 15 मार्चनंतरच सुरू होईल, असे पानसरे यांनी सांगितले.