पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर गोळीबार, थोडक्यात बचावले; आरोपीला अटक

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारातून ते थोडक्यात बचावले. या वेळी प्रसंगावधान दाखवत सुरक्षा कर्मचाऱ्यांनी चपळाईने आरोपीला पकडले आणि त्याचे पिस्तूलही ताब्यात घेतले. सुरक्षा कर्मचाऱयांनी सुखबीर बादल यांना सुरक्षित मंदिराबाहेर नेले.

नारायण सिंग चौडा असे गोळीबार करणाऱया व्यक्तीचे नाव असून तो गुरुदासपूर येथील डेराबाबा नानकचा रहिवासी आहे. तो दल खालसाचा सदस्य आहे. बादल हे अकाल तख्त येथे शिक्षा भोगण्यासाठी सकाळीच पोहोचले होते. ते क्लॉक टॉवरच्या बाहेर एक भाला धरून बसले होते. त्याच वेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. 2 डिसेंबर रोजी राम रहीम प्रकरणातील 5 सिंग साहिबांची श्री अकाल तख्त साहिब येथे बैठक झाली. यात त्यांना आणि इतर मंत्रिमंडळ सदस्यांना शिरोमणी अकाली दल सरकारच्या काळात धार्मिक गैरवर्तनाच्या आरोपाखाली शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात 30 ऑगस्ट 2024 रोजी सुखबीर सिंग बादल यांना श्री अकाल तख्तने म्हणजेच तनखैय्या (धार्मिक गैरवर्तनासाठी दोषी) घोषित करण्यात आले होते.

या पाच प्रकरणांत बादल सरकार दोषी

  • 2007 मध्ये सलाबतपुरा येथे डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम यांनी शिखांचे 10 वे गुरू श्री गुरू गोविंद सिंह यांच्यासारखे कपडे परिधान करून अमृत शिंपडण्याचे नाटक केले होते. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होऊनही बादल सरकारने माघार घेतली होती.
  • सुखबीर बादल यांनी त्यांचे वजन वापरून राम रहीमला माफी मिळवून दिली. शीख समाजाच्या संतापामुळे अखेर श्री अकाल तख्त साहिबने राम रहीमला माफी देण्याचा निर्णय घेतला.
  • बादल सरकारच्या कार्यकाळात काही लोकांनी बुर्ज जवाहर सिंग वाला येथील गुरुद्वारा साहिबमधून श्री गुरू ग्रंथ साहिबची चोरी केली होती. त्यानंतर बरगारी येथील गुरुद्वारा साहिबमधून श्री गुरू ग्रंथ साहिबचे 110 भाग चोरून बाहेर फेकण्यात आले. त्यामुळे शीख समाजात प्रचंड संताप होता. अकाली दल सरकार आणि तत्कालीन गृहमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी या प्रकरणी वेळीच चौकशी केली नाही.
  • खोटय़ा केसेसमध्ये मारल्या गेलेल्या शिखांना अकाली दल सरकार न्याय देऊ शकले नाही.
  • डेरा मुखीला कर्जमाफी दिल्यानंतर याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यात एसजीपीसी निधीतून अंदाजे 90 लाख रुपये खर्च करण्यात आले. सुखबीर बादल यांच्याशिवाय त्यांच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्यालाही शिक्षा सुनावण्यात आली.