मणिपूरमध्ये दोन जिह्यांत गोळीबार

मणिपूरच्या इम्फाळ पूर्व आणि कांगपोकली जिह्यात आज पुन्हा गोळीबाराच्या घटना घडल्या. कुकी आणि मैतेई समुदायात पुन्हा हिंसाचार सुरू झाला असून स्थानिक लोकांनी मोर्टारही डागले जात असल्याचे म्हटले आहे. दोन्ही जिह्यांत 24 डिसेंबरपासून सुरू असलेल्या गोळीबाराच्या घटनेने जिह्यांतील यिंगंगपोकपी, थमनापोकपी, थंबापोकपी, सबुंगखोक खुनौ, शांती खोंगबल आणि इतर भागात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. यिंगंगपोकपी येथील ग्रामस्थांनी त्यांना सुरक्षित स्थळी नेण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली आहे. या गोळीबारात आतापर्यंत तरी कुणाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. दुसरीकडे सुरक्षा सल्लागार आणि मणिपूरचे पोलीस महानिरीक्षकांना इम्फाळ जिह्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी दिले आहेत.