सासवड एसटी स्टँडसमोर असलेल्या श्रीजास या आईस्क्रीम दुकानात तिघा हल्लेखोरांनी गोळीबार करून दुकानाच्या मालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात मालक गंभीर जखमी झाला आहे. सासवडच्या मुख्य परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
राहुल नामदेव टिळेकर (वय 41, रा. सोळंकी टॉवर्स, सासवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. हल्ला करून तिघे हल्लेखोर पसार झाले आहेत. गुरुवारी (दि. 18) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असून, सासवड पोलीस स्टेशनला उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी राहुल याच्या एसटी स्टँडसमोरील श्रीजास् आईस्क्रीम दुकानात दुचाकीवरून तिघेजण आले. त्यानंतर काही वेळातच त्यातील एकाने राहुल याच्या दिशेने जवळून गोळीबार केला. त्यानंतर तिघेही गाडीवरून पुणे बाजूने पसार झाले. जखमी राहुल यास स्थानिकांनी जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून जखमीला पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहुल याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अविनाश शिळीमकर, उपविभागीय अधिकारी तानाजी बर्डे व अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींच्या नातेवाईकाने फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होईल व गुन्हे अन्वेषण विभाग, सासवड पोलीस स्टेशन यांची पथके तपासासाठी पाठवली असल्याचे पोलीस अधीक्षक देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, या घटनेने सासवड शहर व परिसरात सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.