दोडाच्या जंगलात धुमश्चक्री; दहशतवाद्यांशी लढताना कॅप्टनसह हिंदुस्थानचे चार जवान शहीद

जम्मू-कश्मीरच्या डोडा जंगलात दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यात धुमश्चक्री सुरूच असून  डोडा जिह्यातील डेसा येथील जंगलात शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात हिंदुस्थानी लष्कराच्या पॅप्टनसह 4 जवान शहीद झाले. दरम्यान, 1 जानेवारीपासून आतापर्यंत दहशतवाद्यांशी लढताना लष्कराच्या एका कॅप्टनसह 12 जवान शहीद झाले आहेत तर 10 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घटल्याचा एनडीए सरकारचा दावा फोल ठरला आहे.

दहशतवाद्यांशी झालेल्या धुमश्चक्रीत कॅप्टन ब्रिजेश थापा, नायक डी राजेश, शिपाई बिजेंद्र आणि अजय सिंह हे शहीद झाले. राष्ट्रीय रायफल्सची तुकडी आणि जम्मू कश्मीर पोलिसांच्या विशेष तुकडीने संयुक्तपणे डोडाच्या जंगलात राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा उचलत पळ काढला होता. तिथे ते दबा धरून होते. सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा धुमश्चक्री झाली आणि त्यात कॅप्टनसह 4 जवान गंभीररीत्या जखमी झाले. उपचादारम्यान त्यांचा मृत्यू झाला.

डोडापासून 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या देसा जंगल पट्टय़ातील धारी गोटे उरारबागी येथे सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय रायफल्सचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-कश्मीर पोलिसांच्या आणखी तुकडय़ा तसेच निमलष्कराचे जवान डोडा जिह्यातील जंगलात तैनात करण्यात आले. पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. ड्रोन आणि हॅलिकॉप्टरद्वारे शोधमोहीम सुरू करण्यात आल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कठुआ जिह्यातील मचहेडी जंगलात आठवडाभरापूर्वी अशीच धुमश्चक्री उडाली होती. त्यावेळीही पाच जवान शहीद झाले होते. त्याचबरोबर अनेक जवान जखमी झाले होते. 

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि अधिकाऱ्यांनी शहीद झालेल्या जवानांना त्यांच्या शौर्यासाठी आदरांजली वाहिली आहे. तर शहीद झालेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असून हिंदुस्थानी लष्कर सदैव त्यांच्यासोबत आहे, अशा शब्दांत हिंदुस्थानी लष्कराने एक्सवरून श्रद्धांजली वाहिली आहे.

हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित कश्मीर टायगर्सने घेतली आहे. त्यांच्या हल्ल्यात लष्कराच्या कॅप्टनसह 12 जवानांचा मृत्यू झाला असून 6 जवान गंभीर जखमी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

78 दिवसात 11 दहशतवादी हल्ले

 15 जुलैः डोडा येथील धारी गोटे उरारबागी येथे शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी रात्रीच्या अंधारात लष्कराच्या जवानांवर अंधाधुंद गोळीबार केला. यात 5 जवान शहीद झाले.

9 जुलैः डोडाच्या गढी भगवा परिसरात रात्री लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. 2 ते 3 दहशतवादी जंगलात लपल्याचा संशय होता.

8 जुलैः कठुआ येथे दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. यात 5 जवान शहीद झाले तर 5 गंभीर जखमी झाले. दहशतवाद्यांनी ग्रॅनेड फेकले होते.

7 जुलैः राजौरीच्या मंजाकोटमध्ये लष्कराच्या कॅम्पजवळ दहशतवादी हल्ला झाला होता. यात एक जवान गंभीर जखमी झाला.

26 जूनः डोडाच्या गंडोह येथे सुरक्षादलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर झालेल्या धुमश्चक्रीत एक जवान गंभीर जखमी झाला.

12 जूनः डोडाच्या गंडोह येथे शोधमोहिमे दरम्यान दहशतवादी हल्ला झाला. यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला.

11 जूनः डोडाच्या चत्तरगाला चेकपॉइंटवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह 5 जवान जखमी झाले होते. तर सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला.

9 जूनः रियासीच्या पंदा परिसरात शिव खोडीतून कटरा येथे जाणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला होता. यात ड्रायव्हरला गोळी लागल्याने बस दरीत कोसळली. यात 9 भाविकांचा मृत्यू झाला होता.

4 मेः पूँछच्या शाहसितार येथे हवाई दलाच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. यात हवाई लाचे अधिकारी विकी पहाडे शहीद झाले. तसेच 5 जवान गंभीर जखमी झाले.

28 एप्रिलः उधमपूरच्या एका गावात दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. यात व्हिलेज डिफेन्स गार्ड जखमी झाला. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 कश्मीरमधून जवानांचे पार्थिव शवपेटीतून जाते – मेहबुबा मुफ्ती

देशाच्या सीमार सुरक्षित ठेवण्यासाठी जवान कश्मीरमध्ये येतात, मात्र इथून परत जाते ते त्यांचे पार्थिव… तेही शवपेटीतून… मोदी सरकार म्हणतेय की कश्मीर खोऱ्यातला दहशतवाद संपलाय, मग कश्मीरमध्ये आपल्या जवानांना कोण मारतेय? या सर्व घटनांना कोण जबाबदार आहे? जम्मूत सध्या जे काही घडतेय त्याची जबाबदारी हे सरकार घेणार आहे का? असे सवाल करत जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी एनडीए सरकारला धारेवर धरले. जम्मूत सध्या काय घडतेय? तिथले वातावरण कोणामुळे बिघडलेय? तिथे मोठया प्रमाणात हत्या होत आहेत, आपले जवान मारले जात आहेत. गृहमंत्र्यांनी या घटनांची जबाबदारी घ्यावी, असेही मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.

34 दिवसांत पाचवी धुमश्चक्री

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करप्रमुखांकडून दहशतवादी हल्ल्याबाबतची माहिती घेतली असून जम्मूमध्ये गेल्या 34 दिवसांत पाचवेळा लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. 26 जूनला एक आणि 12 जूनला 2 हल्ले झाले होते. तर 9 जुलै रोजी एक हल्ला झाला होता. त्यानंतर उडालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

सरकारच्या चुकीमुळेच  जवानांचे प्राण जाताहेत – राहुल गांधी

सातत्याने होत असलेले हल्ले जम्मू-कश्मीरमधील विदारक स्थिती सांगतात. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जवानांना प्राण गमवावा लागत आहे. सातत्याने सुरक्षेत होत असलेल्या चुकांबाबत सरकारने उत्तर द्यायला हवे, अशी मागणी प्रत्येक देशभक्त करत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली. तसेच सध्याच्या घडीला संपूर्ण देश दहशतवादाविरोधात एकजुटीने उभा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.