
घर खरेदीच्या नावाखाली सायबर ठगाने अग्निशमन अधिकाऱ्याची ऑनलाइन फसवणूक केली आहे. अग्निशमन दलात अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या तक्रारदारांनी 2018 मध्ये पनवेलमध्ये घर खरेदी केले. त्यांना ते घर विकायचे होते. त्यासाठी त्यांनी एका ऑनलाइन फ्लॅटफॉर्मवर जाहिरात अपलोड केली. सप्टेंबर महिन्यात त्यांना एकाचा फोन आला. फोन करणाऱ्याने तो लष्कराचा अधिकारी असल्याचे भासवले. त्यांच्या घराची जाहिरात पाहून ते खरेदी करायचे असल्याचे त्याला सांगितले. त्यांना व्हॉट्सअॅपवर काही कागदपत्रे पाठवली. ती कागदपत्रे पाहून तक्रारदारांचा विश्वास बसला.
घर 27 लाख रुपयांना विकत घेणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. टोकन म्हणून अडीच लाख रुपये देतो असे भासवले. काही वेळाने त्यांना फोन करून आपले वरिष्ठ त्यांच्याशी बोलू इच्छितात असे सांगितले. टोकनचा व्यवहार हा लष्कराच्या बँकेमार्फत होणार असल्याचे सांगितले. त्यासाठी सुरुवातीला थोडे पैसे टाकण्यास सांगितले. ते पैसे खात्यात जमा होणार आहेत, त्यामुळे त्याने सुरुवातीला 85 हजार रुपये ऑनलाइन पाठवले. ते पैसे खात्यात जमा झाले नसून लष्कराच्या बँक खात्यात जमा करा, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्याने पुन्हा एक लाख 49 हजार रुपये पाठवले. पैसे पाठवल्यानंतर पुढील व्यवहार नंतर करू, असे त्यांना सांगितले, परंतु खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तक्रारदारांनी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु काही उपयोग झाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली.