नांदेड शहरातील आनंदनगर भागात आज भल्या पहाटे मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीत हॉटेल, हॉस्टेल, मोबाईल शॉपी आणि ऑईल शोरुम जळाले आहे. अग्निशमन दलाचे पथक वेळीच घटनास्थळी दाखल झाल्यामुळे हॉस्टेलमधील अनेक मुलींचे जीव वाचले आहे. मात्र दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नांदेड शहरात आनंदनगर भागात नैवेद्यम हॉटेल, जीव्हीसी मोबाईल शॉपीला सुरुवातीला आग लागली. या आगीने पाहता पाहता रौद्ररुप धारण केले. नैवेद्यम हॉटेलच्या वरच्या बाजूला पहिल्या मजल्यावर असलेल्या वैष्णवी या मुलींच्या हॉस्टेललाही आगीने वेढा घातला. तत्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान वेळेवर घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सर्वप्रथम हॉस्टेलमधील सर्व 70 मुलींना सुखरुप बाहेर काढले. या आगीत नैवेद्यम हॉटेल, जीव्हीसी मोबाईल शॉपी जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. मोबाईल शॉपीच्या डाव्या बाजूस श्री महालक्ष्मी ऑईल शोरुमचे मोठे दुकान होते. या दुकानाच्या शटर व समोरील सिलींगला मोठी आग लागली. मोबाईल शॉपीचे सीसीटीव्ही कॅमेरे व शटर पूर्णतः जळाले, तर हॉटेलचेही मोठे नुकसान झाले. महालक्ष्मी ऑईल शोरुमच्या समोरच्या भागाला मोठी आग लागल्याने त्याचेही मोठे नुकसान झाले.
या आगीत जवळपास 40 ते 50 लक्ष रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाचे प्रमुख केरोजी दासरे व त्यांच्या सहकार्यांनी तीन तासातच या आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्राथमिकदृष्ट्या शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागली असावी अशी शंका व्यक्त होत आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात याबाबत संबंधित दुकानदारांनी तक्रार दिली आहे. भल्या पहाटे लागलेल्या या आगीमुळे आजूबाजूची मंडळी देखील घाबरुन गेली. वेळीच अग्निशमन दल पोहोचल्याने जिवीतहानी झाली नाही. नांदेड शहर शैक्षणिकदृष्ट्या महत्वाचे शहर असून, याच आनंदनगर, बाबानगर व भाग्यनगर भागात मोठ्या प्रमाणात कोचिंग क्लासेस आहेत. नांदेड शहरात बाहेरुन येणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नांदेडमधील हॉस्टेलची सुरक्षितता रामभरोसे असून, घरगुती मंडळी देखील आता विनापरवाना हॉस्टेल चालवत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह कामानिमित्त नांदेडमध्ये रहायला येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.