मुंबईच्या घाटकोपरमध्ये रमाबाई नगरमध्ये एका सातमजली इमारतीला आग लागण्याची घटना घडली आहे. घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकर नगरमधील शांतीसागर इमारतीला शनिवारी मध्यरात्री आग लागली. या आगीमुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला. त्या धुरामुळे 13 जणांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
घाटकोपर पूर्व रमाबाई आंबेडकर नगरमध्ये शांतीसागर या सातमजली इमारतीला शनिवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. इमारतीच्या मीटर कॅबिनमधील वायरिंग जळाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीमुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला. इमारतीत सुमारे 80 जण अडकले होते. अग्निशमन दलाने त्यांची सुखरुप सुटका केली. त्यातील 13 जणांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून त्यांची प्रकृती स्थिर झाल्यावर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.