गगनचुंबी इमारतींची अग्निसुरक्षा वाऱ्यावर, अग्निशमन दलाकडे केवळ22 व्या मजल्यापर्यंत पोहोचणारी शिडी

मुंबईत गगनचुंबी इमारतींची उंची 120 मीटरवरून 180 मीटर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. याबाबत निर्णय घेतला गेला तर मुंबईत 50 ते 60 मजल्यांच्या इमारती येत्या काही काळात उभ्या राहतील, मात्र या इमारतींना दुर्दैवाने आग लागलीच तर अग्निशमन दलाकडे सध्या 22 व्या मजल्यापर्यंत शिडीने जाऊन आग नियंत्रणात आणण्याची यंत्रणा आहे. दरम्यान,  गगनचुंबी मजल्यावरील आग नियंत्रणाची पहिली जबाबदारी त्या त्या सोसायटीवरच असते. त्यासाठी अत्याधुनिक अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसवणे हे सोसायटींचे आहे, असे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे.

मुंबईतील जमीन संपल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून मुंबईची वाढ उभी होत असून 40 ते 45 मजल्यांपर्यंत अनेक गगनचुंबी इमारती उभ्या राहल्या आहेत, मात्र आता या इमारतींची उंची आणखीन वाढणार आहे. नगरविकास खाते मुंबईतील इमारतींची उंची 120 मीटरवरून 180 मीटर करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे इमारतींचे बांधकाम 60 मजल्यांपर्यंत करता येणार आहे. त्यासाठी हायपॉवर कमिटीच्या परवानगीची गरज राहणार नाही. मात्र या गगनचुंबी इमारतींच्या अग्निसुरक्षेचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

जनजागृतीसाठी अग्निसुरक्षा सप्ताह 

अग्निसुरक्षेसाठी जनजागृती निर्माण व्हावी यासाठी अग्निशमन दलाकडून वर्षात एकदा मुंबईकरांसाठी अग्निसुरक्षा सप्ताहाचे आयोजन पेंद्रांमध्ये केले जाते. यात विविध उपकरणांच्या माहितीबरोबर आग लागलीच तर कोणती खबरदारी घेतली पाहिजे, याची माहितीही मुंबईकरांना दिली जाते.

अशी आहे अग्निशमन दलाची यंत्रणा

अग्निशमन दलात डिजिटल मोबाइल रेडिओ प्रणाली, आग आटोक्यात आणण्यासाठी रोबो, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म, आरटीक्युलेटेड वॉटर टॉवर हॅजमेट, अतिशीघ्र प्रतिसाद वाहने आणि श्वसन मास्क, जलद आग आटोक्यात आणण्यासाठी अत्याधुनिक ऑटोमेटेड लॅडर वाहने आहेत. सध्या अग्निशमन दलात 30 मीटर, 37 मीटर, 40 मीटर, 55 मीटर आणि 64 मीटर टर्न टेबल आहे. त्यामध्ये 68 मीटर उंचीच्या चार टर्न टेबलची भर पडणार आहे. 64 मीटर म्हणजे 22 व्या मजल्यापर्यंत या वाहनावरून लिफ्टच्या सहाय्याने पोहोचणे शक्य आहे. दरम्यान, 24 मजल्यापर्यंत पोहोचून मदत आणि बचावकार्य करण्यासाठी 68 मीटर उंचीची टर्नटेबल लॅडर (वाहनासह शिडी) मागवण्यासाठी महापालिकेने नुकत्याच निविदा मागवल्या आहेत.

अग्निशमन दलाकडे सध्या जागतिक दर्जाची अग्निसुरक्षेची उपकरणे आहेत. जगभरात 22 व्या मजल्यापर्यंत वाहनात असलेल्या शिडीच्या सहाय्याने जाऊन आग नियंत्रणात आणण्याची यंत्रणा आहे. त्या पुढील मजल्यांवरील आग आटोक्यात आणण्याची पहिली जबाबदारी त्या त्या सोसायटीची आहे. त्यासाठी त्यांची अग्निप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित असायला हवी. त्याचबरोबर आग लागली तर त्यातून सुखरूप सुटण्यासाठी रहिवाशांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही सोसायटीची आहे. त्यासाठी सोसायटीने आमच्याशी संपर्क साधला तर आम्ही सशुल्क प्रशिक्षण देतो.   रवींद्र आंबुलगेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी