‘माझी वसुंधरा अभियानां’तर्गत एक कोटीचे बक्षीस पटकाविलेल्या राज्यातील पहिल्या सौरग्राम मान्याचीवाडी (ता. पाटण) येथे ‘फटाकेमुक्त गाव’ ही संकल्पना गेल्या अनेक कर्षांपासून राबविली जात आहे. दिवाळीसह सण, उत्सव अगर अन्य प्रसंगात फटाके वाजविल्यास दोन हजारांचा दंड संबंधितांकडून वसूल केला जात आहे.
विविध स्पर्धा आणि अभियानातून सहभाग नोंदवून आतापर्यंत 76 पुरस्कारांची मानकरी ठरलेल्या मान्याचीवाडीत राबविण्यात येत असलेल्या अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना अन्य गावांसाठी दिशादर्शक ठरत आहेत. प्रदूषण मुक्तीतून पर्यावरण रक्षणाच्या चळवळीला हातभार देण्यासाठी ‘फटाकेमुक्त गाव’ची संकल्पना तेथे अनेक वर्षांपासून राबविली जात असून, चार वर्षांपासून ‘माझी वसुंधरा’ अभियानात गावचा सहभाग झाल्यानंतर तर त्याची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी तेथे सुरू झाली आहे. ‘ग्रामसभा ठरावाने फटाके वाजविण्यास बंदी घातली असून, उल्लंघन केल्यास दोन हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाईल,’ असा सूचना फलक गावच्या प्रवेशद्वारावरच लावला आहे.
सरपंच रविंद्र माने म्हणाले, ‘फक्त दिवाळीपुरतेच नव्हे, तर अन्य उत्सवांत, तसेच मिरकणुकीतही फटाके वाजविण्यास येथे बंदी आहे. मालदन पंचक्रोशीचे जागृत देवस्थान श्री कडजाईदेवीच्या मंदिरात लग्नानंतर करातीने जोडपी दर्शनास येतात. मात्र, फटाके वाजविले जात नाहीत. फटाके वाजविल्याने होणारे हवा व ध्वनी प्रदूषण तसेच आरोग्याची होणारी हानी या संदर्भात आम्ही विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये सतत जागृती करत असतो, त्याचाही चांगला परिणाम दिसून येतो आहे. येथे हवेची गुणवत्ताही नियमित तपासली जाते, असे मान्याचीवाडी सरपंच रवींद्र माने यांनी सांगितले.