डाळ मिलमध्ये गॅस गळती; कंप्रेसरचा स्फोट, 3 कामगारांचा होरपळून मृत्यू

दिल्लीच्या नरेला परिसरात असलेल्या एका डाळीच्या मिलला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत मिलमधील तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर इतर सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दिल्ली अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रदीर्घ प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली असून सध्या आग पूर्णपणे विझवण्याचे काम सुरू आहे.

नरेला येथे श्याम कृपा फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने डाळ मिल आहे. या मिलमध्ये गॅस बर्नरवर डाळी भाजण्याचे काम चालते. दरम्यान तेथील एका पाइपलाइनमधून गॅस गळती झाली. त्यामुळे कॉम्प्रेसर जास्त गरम होऊन त्याचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा अपघात झाला तेव्हा कामगार मिलमध्ये काम करत होते. आग लागल्यानंतर लगेचच कामगार बाहेर धावले, मात्र काही जण आतमध्येच अडकले. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून अन्य सहा जण जखमी झाले आहेत.

श्याम (24 वर्षे), राम सिंग (30 वर्षे) आणि बिरपाल (42 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. अन्य 6 जखमींमध्ये पुष्पेंद्र, आकाश, मोहित, रवी कुमार, मोनू आणि लालू यांचा समावेश आहे. या कारखान्याचे मालक अंकित गुप्ता आणि विनय गुप्ता असून ते एस-7, रोहिणी येथील रहिवासी आहेत.

दरम्यान, दिल्ली पोलीसही घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीचा आढावा घेत पुढील तपास सुरू केला आहे. यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांना पहाटे 3.38 वाजता डाळ मिलमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली होती. तात्काळ आमची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. दरम्यान मिलमधील तीन जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. सध्या आग विझवण्याचे काम सुरू आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना माहिती पाठवण्यात आली आहे. सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. मिलमधील कामगारांच्या सुरक्षेची काय व्यवस्था होती, याचा तपास पोलीस करत आहेत.