वाशीमधील सिडको गृहनिर्माण प्रकल्पाच्या साईटवर काम करणाऱया मजुरांच्या घरांना बुधवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत 200 घरे जळून खाक झाली. अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते.
वाशी येथील सेक्टर 19 मधील ट्रक टर्मिनल च्या जागेवर सिडकोच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरांची उभारणी केली जात आहे. याच प्रकल्पामध्ये काम करणाऱया सुमारे अडीच हजार मजुरांसाठी ठेकेदाराने या ठिकाणी 200 तात्पुरती घरी बांधली आहेत. याच घरांना आज रात्री पावणेदहाच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात सर्वच घरे आगीच्या विळख्यात सापडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केले. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. या घरांमध्ये काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.