बाळकुम परिसरातील छबय्या पार्कमधील एका फ्लॅटला रविवारी रात्रीच्या सुमारास आग लागली. आगीची तीव्रता इतकी होती की याच मजल्यावरील आजूबाजूच्या चार घरांना त्याची झळ बसली. त्यामुळे या आगीत जवळपास पाच घरांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाणे पालिकेच्या अग्निशमन दलाने धाव घेत इमारतीमध्ये अडकलेल्या ४० रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. दरम्यान सुमारे तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली.
ठाण्यातील बाळकुम येथे छबय्या पार्क येथे सहा मजली इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या काजल प्रसाद यांच्या रूम नंबर २०३ मध्ये आग लागली. काजल प्रसाद या भाडोत्री असून त्या घरी असताना रविवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास आग लागली. आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण केल्याने आगीची झळ २०१, २०२ आणि २०४ नंबरच्या घरांनाही बसली. याच दरम्यान इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कापूरबावडी पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन या विभागांनी धाव घेतली. या मजल्यावर अडकलेल्या जवळपास ४० नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. आग रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे नियंत्रणात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नाही अशी माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती विभागाचे वरिष्ठ अधिकारी यासीन तडवी यांनी दिली.
या घरांना बसली झळ
इमारतीमधील विलास साळवी यांच्या रूम नंबर २०१ आणि तारा मिश्रा यांच्या २०२ या दोन घरांचे मुख्य दरवाजे जळून खाक झाले आहेत, तर गुरुदयाल सिंग यांच्या मालकीचे २०३ आणि २०४ हे दोन रूम असून ते दोन्ही रूम त्यांनी भाड्याने दिले आहेत. त्यामधील रूम नंबर २०३ मध्ये ही आग लागली असून त्या रूममधील सर्व लाकडी फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच इलेक्ट्रिक वायरिंग जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच रूम नंबर २०४ या घराचा मुख्य दरवाजा व दरवाजाजवळील काही साहित्य जळून खाक झाले आहे.