महिनाभरापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या देशातील पहिल्या भूमिगत मेट्रो रेलच्या ‘बीकेसी’तील स्टेशनला आज दुपारी 1 वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली. या ठिकाणचे लाकूड सामान, इलेक्ट्रिक वस्तू आणि वायरिंगमुळे आगीचा भडका उडून संपूर्ण स्थानकात धुराचे लोळ परसल्याने स्थानकातील प्रवाशांमध्ये घबराट उडाली. यावेळी तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांना शिडीच्या सहाय्याने बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.
‘आरे’ सिप्झ ते वांद्रे कुर्ला संकुलमधील मेट्रो-3 प्रकल्पातील ‘बीकेसी’ स्टेशनला जमिनीपासून सुमारे 40 ते 45 फूट खाली एंट्री-एक्झिट ए-4 गेटजवळ अचानक आग लागली. या ठिकाणी स्टेशनचे काही कामही सुरू होते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात लाकूड सामान, इलेक्ट्रिक वस्तू होत्या. त्यामुळे आग वेगाने पसरत गेली. यावेळी अग्निशमन दलाने 12 बंब आणि आवश्यक साधनसामग्रीसह घटनास्थळी धाव घेत आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. दुपारी 2.45 वाजता आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान, ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली.
दोन तास ‘मेट्रो’ सेवा विस्कळीत
‘मेट्रो’ स्थानकात 1.09 वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीवर पावणेतीनच्या सुमारास आगीवर नियंत्रण आले. मात्र आगीमुळे मेट्रोची सेवा या ठिकाणी सुमारे दोन तास विस्कळीत झाली. काही फेऱया रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. शिवाय रेल्वेमध्येही गर्दी वाढली.