प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभमेळ्यात आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास शास्त्री पुलाजवळच्या सेक्टर 19 मधील गीता प्रेस शिबिरात आगीचा भडका उडाला. आगीच्या ज्वाळा भडकत असतानाच जिकडेतिकडे किंकाळ्या, आक्रोश आणि जीव वाचवण्यासाठी धावपळ असे चित्र होते. आगीत तब्बल 180 तंबू जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या तत्काळ गीता प्रेस शिबिराजवळ पोहोचल्या आणि तासाभरात आग आटोक्यात आणली. जवानांनी जिवाची बाजी लावून 500 भाविकांची सुखरूप सुटका केली. जेवण बनवताना सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आणखी काही सिलेंडर फुटले आणि आगीचा भडका उडाल्याचे समोर आले आहे. आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीत एका साधूचे एक लाख रुपये जळून खाक झाले. आगीत प्रचंड वित्तहानी झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी प्रमोद शर्मा यांनी दिली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून घटनास्थळाचा आढावा घेतला. महाकुंभ नगरीत आगीच्या घटना घडल्यास तत्काळ ऑपरेशनसाठी अॅडव्हान्स फीचर असणारे आर्टिकुलेटिंग वॉटर टॉवर तैनात करण्यात आले आहेत. व्हिडीओ थर्मल इमेजिंगसारख्या अत्याधुनिक प्रणालीचा यात समावेश आहे. याचा वापर गगनचुंबी इमारतींमधील आग विझविण्यासाठी केला जातो. ही प्रणाली तब्बल 35 मीटर उंचावरील आग आटोक्यात आणू शकते.
आखाडे बुडाले अंधारात
आगीमुळे कुंभनगरीत प्रचंड मोठे नुकसान झाले. आग आटोक्यात आणली, परंतु संपूर्ण कुंभनगरी अंधारात बुडाली. वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे भाविकांना बराच काळ अंधारात काढावा लागला.