कोपरगाव नगरपालिकेच्या जुन्या कचरा डेपोला आग; अथक दीड तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण

कोपरगाव नगरपालिकेच्या जुन्या कचरा डेपोला आज सायंकाळी साडेसहा ते पावणे सातच्या सुमारास मोठी आग लागली. यामुळे कचरा डेपोलगत असलेल्या कालेमळा बाजारतळ, सप्तर्षी मळा परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. आगीचे मोठे लोळ दूरवरून दिसत होते. आग विझविण्यासाठी कोपरगाव नगरपालिका व संजीवनी कारखाना यांचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. साधारण एक ते दीड तास आग विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. या आगीत मोठ्या प्रमाणात सुका कचरा जळून गेला.

कोपरगाव नगरपालिकेचा जुना कचरा डेपो या ठिकाणी आहे. शहरातील व आजूबाजूच्या भागातील कचरा येथे टाकण्यात येतो. या कचरा डेपोला सायंकाळी मोठी आग लागली. ही आग एवढी भयानक होती की, त्यामुळे परिसरातील आणि लगतच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. कचरा डेपोलगत असलेल्या परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. धुराचे लोट हवेत दूरवरून दिसत होते. आग विझवण्यासाठी नगरपालिका व संजीवनी कारखाना येथील बंब अविरत काम करत होते. मात्र, आग आटोक्यात येत नव्हती. सव्वा आठ वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

मात्र, आग धुमसत होती. धूर दिसणाऱ्या जागेवर पाण्याची फवारणी करण्याचे काम सुरू होते. वेळीच आग आटोक्यात आणण्यात पालिका प्रशासनाला यश आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या वेळी नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी सुनील आरण, अग्निशमन दलाचे प्रमुख घायतडक आणि कर्मचारी उपस्थित होते.

हा कचरा डेपो बऱ्याच वर्षांपासून बंद करण्यात आला आहे. परंतु, या ठिकाणी दाट काटवण असल्यामुळे आग भडकली. या आगीत भंगारामध्ये असलेले मोबाईल टॉयलेट भस्मसात झाले. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीमुळे मोठे धुराचे काळे लोट अवकाशात दिसू लागल्याने बघ्यांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, या काटवनात काही लोक गांजा ओढत बसतात. त्यामुळे आग लागली असल्याची चर्चा सुरू होती.