Pune Fire – पुण्यातील मंडई मेट्रो स्थानकाला भीषण आग, महिन्याभरापूर्वी मोदींच्या हस्ते झालेलं उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या महिन्यात उद्घाटन झालेल्या पुण्यातील मंडई मेट्रो स्थानकाला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली. रात्री बाराच्या ही घटना उघडकीस आल्यानंतर पुणे अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाची 5 वाहने घटनास्थळी दाखल झाली आणि आग आटोक्यात आणली.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री बाराच्या सुमारास मंडई मेट्रो स्थानकावरील तळमजल्यावर फजोमच्या साहित्याला आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट उठले. यामुळे एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाच मिनिटात आग आटोक्यात आणली. जवानांनी श्वसनरहित अग्निशमन उपकरणाचा वापर करत पाणी मारुन आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नसून वेल्डिंगचे काम सुरू असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

दरम्यान, या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र मेट्रो स्थानकाचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागली तेव्हा प्रवाशांची वर्दळ नव्हती. त्यामुळे अनर्थ टळला. मात्र मेट्रोचे काम अर्धवट असताना निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून घेतल्याने अशा घटना घडत असून प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

खासदार मुरलीधर मोहोळ यांचे ट्विट

भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावपर पोस्ट करत घटनेची माहिती दिली. मंडई मेट्रो स्टेशनची आग नियंत्रणात, सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही! मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा दुर्दैवी प्रकार काही वेळापूर्वी घडला होता. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सदरील घटना मेट्रोचे प्रवासी कामकाज संपल्यानंतर घडली होती. मेट्रो स्टेशनच्या वरच्या भागात वेल्डिंगची काम सुरू असताना हा प्रकार घडला. यासंदर्भात मेट्रोचे कार्यकारी संचालक श्रवण हर्डीकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली असून या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मेट्रो प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली.