बदलापूर बालअत्याचार प्रकरण – दोषी पोलिसांविरुद्ध एफआयआर का नाही नोंदवला?  हायकोर्टाने सरकारची खरडपट्टी काढली

बदलापूर बाल अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर बनावट असल्याचे दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालावरून निष्पन्न झाले असतानाही दोषी पोलीस अधिकाऱ्यांबाबत अद्याप कोणताच निर्णय घेण्यात न आल्याने हायकोर्टाने आज सरकारची खरडपट्टी काढली. दोषी पोलिसांविरुद्ध एफआयआर का नाही नोंदवला, सरकार गुन्हा दाखल करण्यास बांधील नाही का असा सवाल करीत न्यायालयाने सरकारला धारेवर धरले.

अक्षय शिंदे याच्या कथित एन्काऊंटरचा विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) तपास करण्यात यावा, अशी विनंती करीत अक्षय शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज गुरुवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. हा एन्काऊंटर बनावट असल्याचा अहवाल दंडाधिकाऱ्यांनी देऊनही दोषी पोलिसांबाबत कोणतीच भूमिका न घेतल्याने न्यायालयाने सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली व याबाबत सरकारला जाब विचारला त्यावेळी सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी युक्तिवाद केला त्यांनी खंडपीठाला सांगितले की, याप्रकरणी राज्याच्या सीआयडी कडून याबाबतचा स्वतंत्र तपास सुरू आहे.

भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम 196 आणि 193 अंतर्गत दंडाधिकारी चौकशीची व्याप्ती केवळ मृत्यूचे कारण शोधण्यापुरतीच मर्यादित आहे. दंडाधिकारी चौकशी (मृत्यूसाठी) कोण जबाबदार आहे इथवर जायला नको होती. यंत्रणा म्हणून दंडाधिकारी अहवाल आम्हाला बंधनकारक नाही तसेच पोलिसांनी गुन्हा केला आहे की नाही हे तपासण्याचे आमचे स्वतंत्र काम आहे. या युक्तिवादानंतर न्यायालयाने दंडाधिकाऱ्यांची चौकशी ही समांतर तपासाची बाब असल्याचे सरकारला सुनावले तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर एफआयआर दाखल करणे हे सरकारचे काम नाही का अशी विचारणा सरकारला करत या प्रकरणाची सुनावणी उद्या शुक्रवारी ठेवली.

प्रकरण बंद करण्याची अक्षयच्या पालकांची मागणी

हे प्रकरण आपल्याला पुढे लढायचे नाही. त्यामुळे ते बंद करण्यात यावे, अशी मागणी अक्षय शिंदे याच्या पालकांनी आज उच्च न्यायालयात केली. त्यावेळी न्यायालयाने पालकांच्या मागणीची दखल घेत तुमच्यावर कोणी दबाव आणला का? अशी विचारणा त्यांना केली. त्यावर, आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. आम्हाला ताण आणि धावपळ सहन होत नाही. शिवाय, आमच्या सुनेला आताच बाळ झाले आहे, ती एकटी राहते. आम्ही तिच्याकडे राहायला जायचे आहे असे अक्षय शिंदे याच्या पालकांनी न्यायालयाला सांगितले.