
अनधिकृत बांधकामांपाठोपाठ दिवा शहराची ओळख आता बेकायदा शाळांचे माहेरघर अशी झाली आहे. या भागांत तब्बल 81 बेकायदा शाळा असून याविरोधात ठाणे महापालिकेने पोलिसात तक्रार केली आहे. त्यापैकी 68 शाळांच्या विरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. उर्वरित 13 अनधिकृत शाळांविरोधात एफआयआर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिक्षण विभागाच्या या कारवाईच्या छडीने अनधिकृत शाळांचे उद्योग चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 81 अनधिकृत शाळा असून त्यात 19 हजार 708 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व 81 शाळांच्या विरोधात ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अनधिकृत शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांचे इतर अधिकृत शाळेत समायोजन करण्यासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे. शिवाय त्या शाळांना 52 कोटी रुपयांचा दंड केला आहे, तर 81 अनधिकृत शाळांमध्ये सर्वाधिक 65 शाळा या दिव्यात असल्याची धक्कादायक बाब पुढे आल्याने दिवा शहर आता अनधिकृत शाळांचे हब बनल्याचे उघड झाले आहे.
अनधिकृत शाळा
प्रभाग संख्या विद्यार्थी संख्या
दिवा 65 16 हजार 432
मुंब्रा 08 01 हजार 826
माजिवडा 03 562
कळवा 03 415
उथळसर 02 468
शिवसेनेच्या प्रयत्नांना यश
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांनी या बेकायदा शाळांविरोधात आवाज उठवला होता. शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देतानाच त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळेच प्रशासनाला जाग येऊन बेकायदा शाळांना चाप बसला, अशी प्रतिक्रिया सचिन पाटील यांनी दिली.
32 शाळांचे पाणी तोडले
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत शाळांच्या स्थितीचा नुकताच आढावा घेतला. या शाळांची नोंदणी नाही. काही अनधिकृत शाळा अनधिकृत इमारतीत भरवल्या जात आहेत. काही शाळा निवासी इमारतीत भाड्याच्या जागेत असल्याची माहिती उपायुक्त (शिक्षण) सचिन सांगळे यांनी दिली