अनेकदा असं होतं की, आपल्याकडून काहीजण पुस्तकं घेऊन जातात. मात्र ती परत करायला विसरतात. मात्र फिनलँडमध्ये 84 वर्षांनंतर लायब्ररीला पुस्तक परत केल्याची अजब घटना घडली आहे. फिनलँडच्या हेलसिंकी सेंट्रल लायब्ररीत नुकतेच एक पुस्तक आलंय. हे पुस्तक म्हणजे सर आर्थर कोनन डोअल यांची ‘रिफ्युजीज’ ही ऐतिहासिक कादंबरी आहे. 26 डिसेंबर 1939 साली या पुस्तकाची मुदत संपणार होती. त्यानंतर पुस्तक लायब्ररीत जमा करावे लागणार होते. मात्र पुस्तक 27 मे 2024 रोजी परत करण्यात आले. पुस्तक परत करणाऱयाचे नाव समजलेले नाही. तसेच मूळ वाचकाची त्याचे काय नाते होते, तेही समजलेले नाही. ‘यातून एक चांगला संदेश मिळाला आहे. लायब्ररीची मालमत्ता लायब्ररीला परत दिली पाहिजे,’ या भावनेतून पुस्तक आठ दशकांनंतर का होईना परत करण्यात आल्याचे लायब्ररीयन हेनी स्ट्रँड यांनी सांगितले. हे पुस्तक लायब्ररीतून जेव्हा नेण्यात आले होते, त्यानंतर महिन्याभरात सोव्हिएट युनियनने फिनलँडवर हल्ला केला होता. त्यामुळे तत्कालीन परिस्थितीचा विचार करता हे पुस्तक वाचकाला परत करायला जमले नसावे, असा अंदाज आहे.