
रेल्वेचा प्रवास सुखद व्हावा यासाठी प्रवाशांकडून आधीच तिकिटाची बुकिंग केली जाते, परंतु बऱ्याचदा तिकीट कन्फर्म मिळत नाही. वेटिंगवर तिकीट असल्याने प्रवासावेळी सीट मिळत नाही. ट्रेनमधून उभ्यानेच प्रवास करावा लागतो, परंतु आता वेटिंगवरील तिकिटाने रेल्वे प्रवास केल्यास प्रवाशाला दंड द्यावा लागणार आहे. भारतीय रेल्वेने नवा नियम लागू केला आहे. प्रवाशाने वेटिंग तिकिटावर रिझर्व्हेशन डब्यातून प्रवास केल्यास त्याला दुहेरी दंड द्यावा लागेल. वेटिंग तिकीट मिळाले म्हणजे प्रवाशाला आरक्षित डब्यातून प्रवास करण्याची मुभा मिळाली असा होत नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
प्रवाशाने वेटिंग तिकिटावर स्लीपर कोचमधून प्रवास केल्यास 250 रुपयांचा दंड तसेच ज्या ठिकाणी जायचे आहे त्याचे जेवढे भाडे असेल ते दंड म्हणून द्यावे लागणार आहे. जर वेटिंग तिकिटावर एसी कोचमधून प्रवास केल्यास 440 रुपये दंड आणि जेवढे तिकिटाचे भाडे असेल तितके दंड म्हणून प्रवाशाला द्यावे लागणार आहे. म्हणजेच तिकिटासाठी दिलेले पैसे तर वाया जाणार आहेत. तसेच दंड आणि प्रवासी भाडे असा तिहेरी भुर्दंड प्रवाशाला भरावा लागणार आहे.
वेटिंग तिकीट आणि रिफंड
ऑनलाईन तिकीट बुक करताना जर तिकीट वेटिंगवर गेले तर ते आपोआप रद्द केले जाते. त्यानंतर प्रवाशाला तिकिटाचे पैसे रिफंड मिळतात, परंतु प्रवाशाने रेल्वेच्या तिकीट काऊंटरवर जाऊन तिकीट काढले असल्यास असे होत नाही. काऊंटरवरील तिकीट रद्द होत नाही. त्यामुळे प्रवाशाला प्रवास करताना दंड द्यावा लागू शकतो. रेल्वेच्या नव्या नियमाचा उद्देश म्हणजे आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी वेटिंगवरील प्रवाशांना आरक्षित डब्यातून प्रवास करण्याची मुभा नाही.